(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस? प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज
Rain Update : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडले. याबरोबरच 6 आणि 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र-गोवा सागरी किनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर आज मध्यरात्रीपर्यंत 3.5 ते 4.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं मुंबईसह परिसर आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरीत देखील आज मुसळधार पाऊस झाला. लांजा तालुक्यातही जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. तर मंडणगड तालुक्यालाही पावसाने चांगलच झोडपलंय, तालुक्यातील भिंग्लोली आणि समर्थनगर येथे पावसाचे पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जगबुडी आणि काजळी नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे.