Rain Update: पुणे, मुंबई, रायगडमध्ये मुसळधार पाऊस; रेड अलर्टनंतर रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले
Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे: राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, काही ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि मागील अर्ध्या तासापासून पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे. तर रायगड, सिंधुदूर्गमध्ये देखील पावसामुळे पाणीच पाणी झालं आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस
पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि मागील अर्ध्या तासापासून पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे. सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे, रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आहे, पावसामुळे वाहतूक मंदावली आहे, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली विलेपार्ला सांताक्रुज वांद्रे या सर्व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाला आहे. जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी पाणी भरले आहे.
रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांंमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांंमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण रायगड मधील म्हसळा तालुक्याला जोरदार पावसाने झोडपलं असून म्हसळा मधील ढोरजे पूल पाण्याखाली गेला आहे. म्हसळा तालुक्यात सकाळपासून तुफान पाऊस सुरू आहे.नम्हसळा तालुक्यातील ढोरजे गावाला जोडणारा छोटा पूल ओढ्याच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे पाण्याखाली गेल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. तर म्हसळा दिघी मार्गावर देखील पाणीच पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सकाळपासून काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण रायगड मधील म्हसळा श्रीवर्धन तालुक्यात सुद्धा पावसाने सकाळपासून झोडपल्याचं दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक भागांना बसला आहे.
नागोठणे–रोहा मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळली असून, सदर मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. दरडीमुळे नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एकंदरीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस दोडमार्ग मध्ये 123, सावंतवाडी 114 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 14 तासांपासून कुडाळ मधील माणगाव खोऱ्यातील 25 गावातील वीज पुरवठा खंडित आहे.
रायगडातील 6 तालुक्यातील शाळांना सुट्टी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 15 जुलै 2025 रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. वाढत्या पावसामुळे काही भागातील नद्यांना पूर आले असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले आहेत, धरणातून 5 हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आलं आहे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांनी उघडण्यात आले आहेत. कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून 5 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
























