(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यास तयार, मजुरांची यादी द्या; उद्धव ठाकरेंना रेल्वेमंत्र्यांचं उत्तर
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांची यादी द्या, असं पियुष गोयल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांची यादी द्या, असं पियुष गोयल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
काय म्हणाले पियुष गोयल?
उद्धवजी आशा आहे तुम्ही ठीक असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. महाराष्ट्रातील मजुरांची यादी तुमच्याकडे असल्याचं तुम्ही सांगितलं. तुम्ही ती यादी कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असं पियुष गोयल म्हणाले. आशा आहे, ट्रेन स्टेशनवर आल्यावर आधीसारख्या रिकाम्या जाणार नाहीत. तुम्हाला जितक्या ट्रेन हव्या आहेत तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जातील, असं गोयल यांनी म्हटलं.
उद्धव जी, आशा है आप स्वस्थ है, आपके अच्छे स्वास्थ्य के लिए शुभेच्छा। कल हम महाराष्ट्र से 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देने के लिए तैयार है। अपने बताया की आपके पास श्रमिकों की लिस्ट तैयार है। इसलिए आपसे अनुरोध है:
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
CM Uddhav Thackeray | कोरोनाचा गुणाकार जीवघेणा होणार, पण राज्य सरकार सज्ज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
आतापर्यंत 7 ते 8 लाख मजूरांना घरी पाठवलं, यासाठी कुठलं पॅकेज द्यायचं? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही. राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत. मात्र केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन उपलब्ध होत नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
राज्यातून 7 लाख 38 हजार परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात परतले
आतापर्यंत जवळपास 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठवण्यात आले आहे. यासाठी 527 विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आतापर्यंत कामगारांच्या तिकिटांसाठी 85 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आले आहे. या सर्व परप्रांतीय मजुरांना त्यांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी राज्य शासनाच्या बसेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था राज्य सरकार करत असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
CM Uddhav Thackeray | अडचणीच्यावेळी राजकारण करणं हे माझ्या संस्कृतीत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे