पुण्यात शिजणार तब्बल सात हजार किलो पुणेरी मिसळ...30 हजार गरजूंना होणार वाटप
पुण्यात आता 'सुर्यदत्ता-विष्णू महामिसळ 2021' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सात हजार किलो मिसळ तयार करण्यात येणार आहे.
पुणे : मिसळ म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, मिसळ म्हणजे अनेकांचा वीक पॉइंन्ट. पुण्याची मिसळ चांगली की कोल्हापूरची किंवा नाशिकची.... यावर सोशल माध्यमात मध्यंतरी मोठी चर्चा रंगली होती. मिसळच्या बाबतीत खवय्ये इतके आक्रमक झाले होते की सोशल मीडियावर हाणामारीच व्हायची बाकी राहिली होती. आता मिसळ खवय्यांसाठी एक आनंदाची तशीच चकीत करणारी बातमी आहे. पुण्यातील सुर्यदत्ता फूड बँकेच्या वतीने रविवारी तब्बल सात हजार किलो महा मिसळ बनवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पुण्यातील सुर्यदत्ता फूड बँकेच्या वतीनं हा महा मिसळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सात हजार किलो पुणेरी मिसळ केवळ सात तासात तयार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी 14 मार्चला आयोजित करण्यात येणार आहे. पहाटे चार वाजेपासून 'सुर्यदत्ता-विष्णू महामिसळ 2021' या कार्यक्रमाला सुरुवात होत असून सुर्यदत्ताच्या फेसबुक, युट्युबवर हा वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट पाहता येणार आहे. सात हजार किलोची मिसळ तयार करण्यासाठी सुर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने विष्णू मनोहर यांनी पुढाकार घेतला आहे.
ही पुणेरी मिसळ तयार केल्यानंतर ती 30 हजार गरजू लोकांना वाटण्यात येणार असून त्यासाठी 300 एनजीओंची मदत घेण्यात येणार आहे.
सुर्यदत्ता फूड बँकच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या आधी सुर्यदत्ता फूड बँकच्या वतीनं सर्वात मोठा पराठा, पुरण पोळी, कबाब, नॉन स्टॉप कुकिंग मॅरेथॉन (53 तास), 5000 किलो खिडची तयार करणे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मिसळ म्हणजे विकेंडला एकत्र जमायचं कारण, गप्पा मारायचं कारण. पुणे असो वा नाशिक, कोल्हापूर... या शहरात अनेक कुटुंब मिसळ खायला एकत्र बाहेर पडतात. विविध पक्षांचे राजकीय नेते मिसळ खाण्यासाठी एकाच टेबलवर येतात आणि राजकीय चर्चेचा फड रंगवतात. पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि इतरही काही शहरात आता मिसळ हा केवळ खाद्यपदार्थ राहिला नसून ती एक संस्कृती झाल्याचं पहायला मिळतंय.
अती चिकन खाण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कसे ते जाणून घ्या...