Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु; तासाभराच्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी
पुण्यात काही तासांच्या पावासाने अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्यातून रस्ता काढावा लागला आहे. नाना पेठ, रास्ता पेठ, कर्वे रोड, घोले रोड पाण्याखाली गेले आहेत.
Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावासाने(Pune Rain Update) हजेरी लावली आहे. मागील दीड तासापासून संततधार पाऊस सुरु आहे. या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाने शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. अचानक मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडपडीच्या घडना देखील घडल्या आहे. काही परिसरात गारांचा पाऊस झाला आहे.
रस्त्यांवर पाणीच पाणी
काही तासांच्या पावासाने पुण्यातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्यातून रस्ता काढावा लागला आहे. नाना पेठ, रास्ता पेठ, कर्वे रोड, घोले रोड, कात्रज, विद्यापीठ रोड हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. या पावसाचा अनेकांना फटका बसला आहे. धानोरी-लोहगाव या दोन्ही परिसरात गारांसह पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहे तर अनेकांच्या घरात पाणी साचलं आहे.
तासाभराच्या पावसानं वाहतूक कोंडी
पुण्यात अचानक पावसाने हजेरी लावल्याने पुण्यातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. संगमवाडीकडून शिवाजी नगरला जाणाऱ्या पुलावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पुणेकर बराच वेळ खोळंबले होते. संध्याकाळच्या वेळी रोजच अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी बघायला मिळते मात्र मुसळधार झालेल्या पावसाने पुणेकरांचा मनस्ताप झाला.
विजांच्या कडकटासह पाऊस
सकाळपासून पुण्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरु होता. नवरात्रोत्सवासाठी नागरिक घराबाहेर पडले होते. मात्र तीनच्या सुमारास ढगाळ वातावरण झालं. अचानक विजांचा कडकडाट झाला लगेच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने देवीच्या दर्शनाला गेलेल्या आणि कामासाठी बाहेर असलेल्या पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. शिवाजी नगरमध्येही विजांसह पाऊस झाला आणि पिंपरी-चिंचवडमध्ये देखील पावसाने हजेरी लावली होती.
चांदणी चौकातील स्फोटकांवर पाणी
चांदणी चौकातील पूल उद्या रात्री अडीच वाजता पाडण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. 600 किलो स्फोटकांचा वापर करुन हा पूल पाडण्यात येणार आहे. यासाठी 1300 छिद्र पाडण्यात आले असून त्यात स्फोटकसुद्धा लावण्याचा कामाला सुरुवात झाली आहे. मात्र मुसळधार पडलेल्या पावसाने या कामाला फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाचा या स्फोटकावर काहीही परिणाम होणार नाही. स्फोटकं वाटरप्रूफ असल्याचा दावा कंपनीने केला आहे.