Pune Nirman Toys : पुण्यातील दोन मित्रांची भन्नाट कल्पना, स्पायडरमॅन सोडून मुलं रमली इतिहासात
लहान मुलांना आता खेळण्याच्या माध्यमातून खऱ्या खुऱ्या सुपरहिरोची माहिती मिळणार आहे. निर्माण टॉर्इजच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत आता खरेखुरे हिरो पोहोचणार आहे.
Pune Nirman Toys : लहान मुलांना सुपरहिरो कोण?, असं विचारल्यास त्यांच्या (Nirman Toys) तोंडून हमखास स्पायडरमॅन, हल्क, आयर्नमॅन, बॅटमॅन, ब्लॅक पँथर ही नावं बाहेर पडतात. या सगळ्यांवर आलेले चित्रपट आणि त्यांचे व्हिडीओ पाहून लहान मुलांनी आपले रियल हिरो ठरवून टाकले आहेत. मात्र याच लहान मुलांना आता खेळण्याच्या माध्यमातून खऱ्याखुऱ्या सुपरहिरोची माहिती मिळणार आहे. निर्माण टॉईजच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत आता खरेखुरे हिरो पोहचणार आहे.
अनेकांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या मावळ्यांचे जीवन आणि त्यांनी केलेले पराक्रम सविस्तरपणे माहिती नसतात. त्यांनी कारकीर्द माहिती नसते. त्यामुळे या लहान मुलांना मावळ्यांच्या कहाण्या कळाव्या आणि त्यांच्यापर्यंत इतिहासातील प्रत्येक शूरवीर पोहचावे, यासाठी प्रत्येक शूरवीराची प्रतिकृती असलेले खेळणे साकारण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 15 हजारांहून अधिक टॉईजची निर्मिती केली आहे.
पुण्यातील दोन मित्रांची भन्नाट कल्पना
पुण्यातल दोन मित्रांनी मिळून हे स्टार्टअप सुरु केलं आहे. केदार सातपुते आणि अमोल कुलकर्णी यांनी मिळून या सगळ्य़ा खेळण्यांची निर्मिती केली आहे. केदार सातपुते हे मॅकेनिकल इंजिनिअर आहेत आणि अमोल कुलकर्णी यांनी फाइन आर्टचे शिक्षण घेतलेलं आहे. सातपुते यांनी मागील 15 वर्ष आयटी कंपनीत काम केलं आहे तर कुलकर्णी यांची 12 वर्षांपासून डिझाइनिंगची कंपनी आहे. दोघांनी मिळून 2021 मध्ये हे स्टार्टअप सुरु केलं आणि सगळ्या लहान मुलांना रियल सुपरहिरोची ओळख करुन देण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी. मुलांमधील इतिहासाबद्दली माहिती मिळावी सोबतच कुतूहल वाढावं. आताचे विद्यार्थी किंवा लहान मुलं भरपूर प्रमाणात मोबाईलचा वापर करत असतात. त्यामुळे त्यांचं स्क्रीनटाईम जास्त आहे. त्यामुळे त्यांचं स्क्रीनटाईम कमी व्हावं आणि काल्पनिक जगातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे, हे खेळणे बनवण्यामागचा प्रमुख हेतू आहे.
पालकांकडून उत्तम प्रतिसाद
मुले मोबाईल वापरतात आणि कार्टुन बघतात, त्यामुळे त्यांचा स्क्रीनटाईम वाढला आणि त्याला चष्मा लागला, अशा अनेक पालकांच्या तक्रारी असतात. त्यातच अनेक मुलांना गोष्टींच्या माध्यमातून माहिती देण्याचं काम पालक करत असतात. त्यात शुरवीरांच्या कथाही सांगतात. मात्र मुलांना त्या फार आवडत नाही. या खेळण्यांमुळे मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींमधून इतिहासाची माहिती मिळत आहे आणि सोबतच ते या खेळण्यांमध्ये रमताना दिसत असल्याचं पालक सांगतात. त्यामुळे ही खेळणी आम्ही आमच्या मुलांसाठी विकत घेतो, असंही पालक सांगतात.