(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनिल मेहता यांचे निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवनवीन लेखक आणि विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या मेहता पब्लिकेशनचे सुनिल मेहता यांचं निधन झालं आहे.
पुणे: मराठी प्रकाशन व्यवसायाला व्यावसायिक रुप देणारे मेहता पब्लिशिंग हाऊसचे कार्यकारी संचालक सुनिल मेहता यांचं निधन झालं आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या पूना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. 31 डिसेंबरला पॅनक्रियाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी होत गेले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचं निधन झालं.
साठच्या दशकात सुनील मेहता यांचे वडील अनिल मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापन केली. तरुण वयातच सुनील मेहता यांनी प्रकाशन व्यवसायात काम सुरु केलं. मराठी प्रकाशन व्यवसायाला व्यावसायिक स्वरुप देण्यात सुनील मेहतांचा मोठा वाटा राहिला. नवनवीन लेखक आणि विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. सुनील मेहता यांच्या निधनानं वाचकांना समृद्ध करणारा माणूस काळाच्या पडद्याआड गेलाय.
गुरुवारी सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळात पुण्यातल्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या कार्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सुनिल मेहता यांचा परिचय
सुनिल मेहतांनी 1986 साली आपल्या वडिलांच्या व्यवसायात पाऊल ठेवलं. मेहता पब्लिकेशनची पुस्तके ऑनलाईनच्या माध्यमातून विक्री करण्यास सुनिल मेहतांनी सुरुवात केली. त्यांनी हिंदी, बंगाली, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमधील पुस्तकांचे मराठी अनुवाद प्रकाशित केले. कोरियन आणि जपानी पुस्तकांचेही मराठी अनुवाद त्यांनीच प्रकाशित केले.
मराठी प्रकाशकांमध्ये ई-बुक सुरु करण्यातील पहिल्या फळीतील प्रकाशक अशी त्यांची ओळख आहे. 2012 मध्ये नॉर्वे येथे झालेल्या प्रकाशकांच्या संमेलनात भाग घेणारे ते एकमेव मराठी प्रकाशक होते.
महत्त्वाच्या बातम्या :