Mumbai Coronavirus Update : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, टास्क फोर्सचा दावा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिलासा
Mumbai Coronavirus Update : राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अजीत देसाई यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली आहे. यावेळी त्यांनी मुंबईतील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत भाष्य केलं.
Mumbai Coronavirus Update : मुंबईत गेल्या 3 आठवड्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत होता. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं मुंबईत धडक दिल्याचं बोललं जात होतं. गेल्या 2 आठवड्यांपासून कमी होणारी रुग्णसंख्या लक्षात घेतली तर असं म्हटलं जाऊ शकतं की, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आता घटताना दिसत असून परिस्थिती आटोक्यात येत आहे. यासंदर्भात राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अजीत देसाई यांनी एबीपी माझाशी बातचित केली आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना डॉ. अजीत देसाई म्हणाले की, "4 दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 20 हजारांच्या पार होती. परंतु, काल (मंगळवारी) 11 हजार दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामागे काही कारण आहेत. सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांचा परिणाम दिसून येत आहे. तसेच नागरिक सतर्क झाले असून काळजी घेत आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "दुसरं कारण म्हणजे, कोविड टेस्टिंग 10 टक्क्यांनी कमी झाली आहे. कारण आता लोक घरच्या घरी टेस्ट करुन स्वतः क्वॉरंटाईन होत आहेत."
दिलासादायक बाब म्हणजे, 85 टक्के मुंबईकरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. दक्षिण आफ्रिकेत आलेली कोरोनाची तिसरी लाट खूपच मोठी होती. परंतु, त्याच वेगानं ती ओसरलीही. मुंबईतही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 800 रुग्णांपैकी केवळ 3 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तसेच एकूण बाधितांपैकी केवळ 20 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे दावा केला जात आहे की, मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय. असं असलं तरी सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करणं आणि काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
मुंबईतील रुग्ण वाढ मंदावली
मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14 हजार 980 इतकी आहे. हा आकडा देखील महत्त्वाचा आहे कारण जे नवीन रुग्ण समोर आले आहेत, त्यापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णांच्या 7283 खाटा भरल्या आहेत. तर 36,573 रुग्णालयातील खाटा रिक्त आहेत. मंगळवारी 851 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तर, शहराचा कोरोना रिकव्हरी रेट सध्या 87 टक्के आहे.
कोरोनाविरुद्धच्या युद्धात मुंबई महानगरपालिकेचा खर्च जवळपास तीन हजार कोटींवर पोहोचला आहे. पालिकेने पुन्हा एकदा आकस्मिकता निधीतून 300 कोटी रुपये काढण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यापूर्वी आकस्मिकता निधीतून 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2021 पर्यंत मुंबई पालिकेने यासाठी 2 हजार 300 कोटी रुपये खर्च केले होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या खर्चामध्ये नागरिकांच्या चाचण्या, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था, नवीन जम्बो कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर, वॉर्ड वॉर रूम, डॉक्टर, परिचारिका आणि बाहेरून येणाऱ्या औषधांचा खर्च समाविष्ट आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Update : दिलासादायक! मुंबईसह राज्यातील रुग्ण वाढ मंदावली
- Omicron : तिसऱ्या लाटेचा धोका! केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्यांना पत्र, दिल्या 'या' सूचना
- नागपूरमध्ये नव्या पद्धतीनं होणार जिनोम सिक्वेसिंग, दोन दिवसांत मिळणार अहवाल
- कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश नाही : ICMR
- Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह