(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune bypoll Election :पुण्यात पुन्हा प्रचाराची रणधुमाळी? प्रशासनाकडून तयारी पूर्ण, लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता
Pune Bypoll: पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर आता लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
Pune bypoll Election : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं (Girish Bapat) निधन झाल्यानंतर आता लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने 17 दिवसांपूर्वी तयारीला सुरुवात केली. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची स्थान निश्चिती करणे ही कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता पोटनिव़डणूक कधी जाहीर होणार?, याकडे लक्ष लागलं आहे.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकहून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पुण्यात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकची निवडणूक पार पडताच 4,220 EVM मशीन आणि 5,070 व्हीव्हीपॅट मशीन पुण्यात पाठवण्यात आल्या आहेत. या मशिन्सची सेटिंग आणि चेकिंग करण्यासाठी 30 इंजिनियर्सची नियुक्ती करण्यात आली. 24 तारखेला या मशिन्सच्या सेटिंग आणि चेकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या EVM मशीनवर पुणे बाय इलेक्शन्स अशी स्टिकर्स लावण्यात आली आहेत.
ही सगळी तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पुणे पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्व राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे. उद्या, 26 मे रोजी पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्व तयारी पूर्ण झाल्याचे पत्र पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता
खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्चला दीर्घ आजाराने निधन झालं. लोकसभेच्या 2024 साली होणारी सर्वसाधारण निवडणुकीस एक वर्षांचा कालावधी बाकी आहे. नियमानुसार एखादी जागा रिक्त झाल्यास सहा महिन्याच्या आत ती जागा नव्याने निवडणूक घेऊन भरली जाते. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाळा तोंडावर असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यास 2024 च्या सर्वसाधारण निवडणुकांना खूपच कमी कालावधी उरेल आणि त्यामुळे पोटनिवडणूक रद्दच करण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो. मात्र सध्या निवडणूक आयोगाने केलेली तयारी बघता ही पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इच्छुकांची मोठी यादी...
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. या पाच जणांपैकी भाजप एकाला उमेदवार म्हणून संधी देण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र या जागेवर राष्ट्रवादीनेही दावा केला आहे.