(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील कार्यक्रमाच्या गर्दीबाबत अजित पवारांचा संताप! म्हणाले, वाटलं उद्घाटन न करता निघून जावं, मात्र...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवारांना येथील गर्दी विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे.
पुणे : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवारांना येथील गर्दी विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे.
अजित पवार म्हणाले की, गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्यांचा हिरमोड झाला असता, मात्र त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असं पवार अजित म्हणाले. दिमाखदार कार्यक्रम होत असताना तुम्ही नियम पाळले नाहीत त्यामुळे मनात खंत वाटते, असं कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले.
ते म्हणाले की, सकाळी 7 ला देखील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आहेत. उद्घाटन झाल्यानंतर 15 लाखांचा चेक मिळाला तो शहराध्यक्षांकडे दिला. लवकरच शहराची कार्यकारिणी करावी लागणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा यावेळी प्रयत्न करणार आहोत.कुठल्याही प्रकारे गटातटाचे राजकारण होता कामा नये.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला लवकरात लवकर लसीकरण कस करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, आघाडीत काम करत असताना कुणी काही जरी वक्तव्य केली तरी तुम्ही काही बोलू नका, वरिष्ठ पातळीवर बोलतील असं सांगा. तिन्ही पक्षांना सोबत घेऊन काम करायचं आहे. आज सेनेचा वर्धापनदिन आहे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतो. आज राहुल गांधींचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला गेला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं चित्रं पाहायला मिळालं. अजितदादा नेहमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मात्र तुफान गर्दी पाहायला मिळाली.