(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune bypoll election : ब्राह्मण समाजाला डावलल्याने कसब्यात भाजपला फटका बसणार का?
भारतीय जनता पक्षाकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पुण्यात फ्लेक्स आणि सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसल्या.
Pune bypoll election : भारतीय जनता पक्षाकडून (Kasba Bypoll Election) मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पुण्यात फ्लेक्स आणि सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. कोथरुड नंतर कसबा पेठ मतदारसंघात देखील ब्राह्मण समाजाला डावललं गेल्याची भावना या प्रतिक्रियांमधून उमटली. त्यापाठोपाठ ब्राह्मण समाज आणि संघटनांचे लोक टिळक कुटुंबीयांना भेटण्यासाठी टिळक वाड्यात देखील पोहोचले. ब्राह्मण समाजाला भाजपकडून गृहीत धरलं जात आहे, असं मत ब्राह्मण समाजातील लोकांनी व्यक्त केलं.
पुण्याच्या शनिवार वाड्याच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या फ्लेक्समधून ब्राह्मण समाजाच्या नाराजीला वाट मोकळी करून देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. कोथरुडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्या पाठोपाठ कसब्यातून टिळक कुटुंबीयांचा पत्ता कापून भाजपकडून ब्राह्मण उमेदवाराला पुन्हा एकदा डावलण्यात आल्याचं ब्राह्मण संघटनांचं मत आहे. या संघटनांचे काही पदाधिकारी थेट टिळकांच्या केसरी वाड्यात पोहचले आणि त्यांनी त्यांची नाराजी बोलूनही दाखवली आहे.
2019 साली कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपने चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली . चंद्रकांत पाटील इथून निवडून आले पण त्यांचं मताधिक्य अर्ध्याहून कमी झालं. कसबा पेठेतही अशीच नाराजी भाजपला भोगावी लागू शकते, असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघावर भाजपकडून गेली चाळीस वर्ष ब्राह्मण उमेदवार निवडणूक लढवत आला आहे. त्यामुळे 1992ची पोटनिवडणूक वगळता इथे भाजपचा उमेदवार गेली चाळीस वर्ष सातत्यानं विजयी होत आला आहे . यावेळी मात्र भाजपने ब्राह्मणेतर उमेदवार देऊन नवीन प्रयोग करून पाहायचं ठरवलं आहे.
कसबा पेठ मतदारसंघात कोणत्या समाजाची किती टक्के मतं?
- 31.45 टक्के मते ओ बी सीं ची मतं आहेत .
-23. 85 टक्के मतं मराठा आणि कुणबी समाजाची आहेत .
- 13 टक्के मतं ब्राम्हण समाजाची आहेत
-10.5 टक्के मतं मुस्लिम समाजाची आहेत .
- 9. 67 अनुसूचित जमातींची टक्के मतं आहेत
-7.11 टक्के मतं जैन आणि ख्रिश्चन समाज घटकांची मतं आहे.
13 टक्के ब्राह्मणांची मतं मिळाल्यांनं बालेकिल्ला
13 टक्के ब्राह्मण समाजाची एकगठ्ठा मतं आतापर्यंत भाजपला मिळत आल्याने भाजपसाठी हा मतदार संघ बालेकिल्ला ठरत आला आहे. मात्र यावेळी ब्राह्मण उमेदवार नसल्याने हा बालेकिल्ला शाबूत राहील का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेले असणार आहे. भाजपकडून इतर समाजघटकांना समावून घेण्याचं आणि त्यांना उमेदवारी देण्याचं धोरण अवलंबण्यात आलं आहे. ते यशस्वी ठरलं आणि भाजपचा विस्तार झाला. मात्र पुण्यातील ब्राह्मण बहुल मतदारसंघात आतापर्यंत भाजपशी निष्ठावंत राहिलेला ब्राह्मण समाज नाराज असल्याचं दिसून आलं. कोथरूडच्या मतदानातून ते जाणवलं. त्यामुळे कसबा पेठच्या निवडणुकीत या समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.