कल्याण-मुरबाड राज्य महामार्गावर ग्रामस्थांकडून खड्ड्यात बसून आंदोलन
कल्याण : कल्याण-मुरबाड राज्य महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यावर आठ ते दहा फूट लांबीचे मोठमोठे खड्डे पडले असून याचा वाहनचालक आणि या भागातील ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र याकडे शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्यानं आज म्हारळ गावातील ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं.
कल्याणहून मुरबाडला जाण्यासाठी म्हारळ, वरप, कांबा, गोवेली या मार्गे राज्य महामार्ग जातो. पुढे हा राज्यमार्ग माळशेज घाटामार्गे अहमदनगर, शिर्डी, श्रीरामपूर या भागाला जोडतो. त्यामुळे लांबपल्ल्याची प्रवासी वाहतूक, मालवाहतूक यासह स्थानिकांच्या वाहनांची वाहतूक याची मोठी ये-जा या मार्गावरून होत असते. या भागात अनेक मोठ्या शाळा असून त्यांच्या स्कूलबसही या मार्गाने ये-जा करतात.
मात्र या रस्त्याची भीषण अवस्था झाली असून रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेदेखील कळायला मार्ग नाहीये. त्यामुळं वाहनचालक आणि या भागातले स्थानिक पुरते हैराण झालेत.
याविरोधात अनेकदा संबंधितांकडे तक्रारी करूनही शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्यानं अखेर आज म्हारळ गावातल्या ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं. तसंच जोपर्यंत रस्त्याची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
संबधित बातम्या
खड्ड्यांप्रकरणी मनसे आक्रमक, तुर्भेतलं PWD चं ऑफिस फोडलं!
खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्ता खोदला
खड्ड्यांविरोधात आंदोलन, मनसेची महापौर, आयुक्तांना प्रतिकात्मक श्रद्धांजली
खड्ड्यांना मंत्री, खासदार आमदारांची नावं; पालघरमध्ये मनसेचं आंदोलन