बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू, परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध
बीड (Beed) जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं बीड जिल्ह्यातील वातावरण गरम आहे.
Beed News : बीड (Beed) जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात नेत्याचे प्रमुख कार्यकर्ते यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनामा यामुळे वंजारी विरुद्ध मराठा असा वाद होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात निदर्शन, आंदोलन, उपोषण, मोर्चे होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हा मनाई आदेश लागू करण्यात आलाय.
जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून हे मनाई आदेश जारी करण्यात आलेत. 19 मार्च मध्य रात्री बारापासून ते 2 एप्रिल पर्यंत हे आदेश लागू असतील. परिस्थिती लक्षात घेऊन यात वाढ देखील होण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार मोर्चे निदर्शने आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध असतील.
राज्यात गेल्या 3 महिन्यांपासून बीड (Beed) जिल्हा विविध घटनांनी चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हळहळला असून बीडमधील गुन्हेगारी आणि दहशतीचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. त्यामुळे, बीडचा बिहार झालाय की काय अशी चर्चा देखील सोशल मीडियावर होताना दिसून येते. बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक (Teacher) धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणावरुन देखील वातावरण तापलं आहे. त्याचबरोबर मराठा, ओबीसी, धनगर, समाजाचे वतीने आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने वातावरण गरम आहे. सध्या बीड जिल्ह्यामध्ये केज येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणी करीता अचानक आंदोलन करत आहेत. राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांचे न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने, उपोषण मोर्चे इत्यादी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली होती. या हत्येत आत्तापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे या आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणावरुन सध्या विरोधक आणि सत्ताधारी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्यावरुन देखील वातावरण गरम आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल

























