एक्स्प्लोर
गाळात रुतला ‘सूर्या’, कालवे बनले उकिरडे!
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुमारे 100 गावांना सूर्या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. याच कालव्यातून 14 हजार 500 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली आहे. ज्यामुळे येथील शेतकरी दुबार पीक घेतो.
पालघर : डहाणू आणि पालघर तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात शेतीला सूर्या प्रकल्प अंतर्गत कलव्यातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु गेल्या 10 ते 15 वर्षांपासून कालव्यांची डागडुजी, गाळ काढण्याची आणि साफसफाईची कामे केली नसल्याचे पाणी पुरवठा करणारे कालवे सध्या उकिरडे बनले आहेत.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुमारे 100 गावांना सूर्या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. याच कालव्यातून 14 हजार 500 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली आहे. ज्यामुळे येथील शेतकरी दुबार पीक घेतो. तर दरवर्षी 15 डिसेंबरपासून कालव्यातून जिल्ह्यातील शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र गाळ साचल्याने, साफसफाई न केल्याने चालू वर्षी 18 तारखेपासून पाणी सोडले खरे, पण अद्यापही काळव्यातून पाणी शेवटी पोहोचलाच नाही.
सूर्याचे पाणी उर्से, ऐना, सारणी, दाभोण, साखरे चिंचपाडा, बऱ्हाणपूर, आंबेदा, आकेगव्हान इत्यादी मुख्य कालवे हे डोंगरालगत असल्याने मोठया प्रमाणात माती, दगडाने, पाचोळा, काटेरी झाडे यांनी भरले आहेत. पावसाळ्यात मोठ्या डोंगर भागातून माती, मुरुम, दगड इत्यादी गोष्टी वाहून येत असल्याने कालवे भरले. त्याचप्रमाणे कालव्यांना जोडणारे काही ठिकाणचे लघु कालवे व त्यालगत असणारे उप-कालवे अद्याप माती भरावांचे आहेत.
सदर लघु कालव्यातून थेट शेतीला पाणीपुरवठा केला जातो. सदर लघु कालव्यात मोठ्या प्रमाणात गवत झुडपे वाढलेली आहेत. तसेच सतत माती साचून हे कालवे उथळ झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होत असल्याने पाणी मोठया प्रमाणात वाया जाते परिणामी शेवटच्या शेती प्रयत्न पाणी पोहोचत नाही, तर मुख्य कालव्यातून व लघुकालव्यातून शेतीला पाणीपुरवठा करणारे गेटही गाळ साचल्याने भरले आहेत आणि काही तुटून गेले आहेत. त्यांची वेळोवेळी दुरुस्ती झाली नसल्याने पाणी गळती होते. त्यामुळे कालवे असूनही पाणीच मिळत नाही किंवा मिळते ते अपूर्ण यामुळे पिके होरपळून जातात म्हणून काही शेतकऱ्यांनी शेती दोन वर्षापासून ओस टाकली आहे.
गाळ, रेती, दगडगोटे, झाडे झुडपे, गवत,यांनी कालवे मोठया प्रमाणात भरल्याने पाण्याचा प्रवाह कमी होतो. काही नाले मोऱ्यांमध्ये हा सर्व गाळ साचल्याने ते बंद होतात. त्यामुळे पाणी पुढे न जाता मध्येच कालवे फुटतात किंवा पाणी ओसंडून वाहून जाते.
दरम्यान काही ठिकाणी सतत गाळ साचल्याने कालवे दिसेनासे झालेत तर काही ठिकाणी बुजून गेले आहेत. जलसंपदा विभागाला बिगर सिंचनातून सूर्या प्रकल्पातून साधरण 20 कोटी तर सिंचनातून 2 ते 3 कोटी व वीज प्रकल्प असे साधारण वार्षिक 24 ते 25 कोटी उत्पन्न मिळते. मात्र तरीही कालव्यांची दुरुती केली जात नसल्याने कालव्यांची दयनीय स्थिती झाली आहे. त्यातच यावर्षी एमएमआरडीएने सूर्याचं पाणी आरक्षित केल्याने शेतकाऱ्यासमोर मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे, तर या पुढे फक्त 19 हजार हेक्टर पैकी 8 हजार हेक्टरच भाग सिंचनाखाली ठेवण्यात येईल. मुळात पाणीपट्टीच्या रुपाने 24 ते 25 कोटी रुपये दरवर्षी वसूल होत असतानाही कालव्यांची डागडुजी का होत नाही, असा सवाल शेतकरी संघटनांकडून विचारण्यत येतो आहे.
तर 30 ते 35 वर्ष ह्या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा होत आहे. काही वर्षांपासून कालवेदुरुस्तीसाठी शासनाची परवानगीच न मिळाल्याने दुरुस्ती झाली नाही. परंतु आता आम्ही पाणी वापर संस्था स्थापन करुन ह्या कालवयांची जबाबदारी शेतकऱ्यांवर सोपवण्याचा विचार करत आहोत.
पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण हे सर्वात जास्त पाणी साठवण्याची क्षमता असलेले धरण असून या धरणातून वसई विरार महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्र, तारापूर अणूउर्जा प्रकल्प, डहाणू रिलायन्स, आजूबाजूची सर्व शहर त्याच प्रमाणे उन्हाळ्यात सूर्या उजव्या आणि डाव्या कालव्याअंतर्गत शेतीला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र कालव्याअंतर्गत सोडण्यात आलेले पाणी कालवे नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे चित्र आहे. तर दिवसेंदिवस भाताला भाव कमी मिळत असल्याने नाईलाजास्तव भातशेतीच करावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
कवडास धरण पूर्ण भरलं आहे, तर धामणी धरण 100 टक्के पाणीसाठा आहे. चालू वर्षी पुरेसा पाऊस झाल्याने प्रथमच धामणी धरण ओव्हरफ्लो झालं. कवडास आणि धामणी धरणातील 21% पाणी पिण्यासाठी, 74% शेतीसाठी 5% उद्योग क्षेत्रासाठी वापरण्यात येते.
शिवाय, धामणी धरणातून 7 मेगावॅट वीजनिर्मितीही होते. या धरणाच्या पाण्याखाली एकूण 14,696 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते, तर धरणाची पाणी क्षमता 299.09 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण म्हणजे सर्वात जास्त पाण्याची क्षमता असणारे धरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement