राष्ट्रपती रामनाथ कोविंद रत्नागिरी दौऱ्यावर, मंडणगडात छावणीचे स्वरूप
President Ram Nath Kovind : राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त मंडणगडात छावणीचे रूप, आंबडवेत जय्यत तयारी
![राष्ट्रपती रामनाथ कोविंद रत्नागिरी दौऱ्यावर, मंडणगडात छावणीचे स्वरूप President Ram Nath Kovind to visit Maharashtra Ratnagiri राष्ट्रपती रामनाथ कोविंद रत्नागिरी दौऱ्यावर, मंडणगडात छावणीचे स्वरूप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/b07b19789ca3c137c27ab7b6acca124c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
President Ram Nath Kovind : भारताचे राष्ट्रपती डॉ.रामनाथ कोविंद शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावाला भेट देणार आहेत. राष्ट्रपतींच्या या दौर्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील सगळे प्रशासकीय अधिकारी कामाला लागलेले दिसून येत आहेत.मंडणगड तालुक्याला अक्षरशः लष्करी छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे. या संपूर्ण दौऱ्यावर पोलिसांसह गुप्तचर यंत्रणाची बारीक नजर आहे.
राष्ट्रपतींच्या आंबडवे दौऱ्यानिमित्त प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद हे मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यातील कार्यक्रमाविषयी यंत्रणेने अधिकृत कोणतीही जाहीर घोषणा केलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दौर्यात राष्ट्रपती हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी मौजे आंबडवेचे दौऱ्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. याशिवाय गावातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिरात जाहीर कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या आलिशान मंडपासह विविध कार्यक्रमांची विविध सुविधांची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येथे अतिशय मर्यादित लोकांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमाचे संकेतही मिळाले आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा झालेली नाही.
राष्ट्रपतींचा दौरा हा तालुक्यातील ऐतिहासिक असून देशाच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतींनी मंडणगड तालुक्यात भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपतींच्या आंबडवे दौऱ्यामुळे ही संधी तालुक्यात प्राप्त झाली असून यामुळे तालुक्यातील लौकिकात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून हे गाव दत्तक घेतले होते. गावासह ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावांचा 355 कोटींचा विकास आराखडा तयार केला, मात्र आराखडा आजही कागदावरच आहे.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे हे सन 2014-15 साली तत्कालीन राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विकासासाठी दत्तक घेतले होते. या गावच्या विकासासाठी सुमारे तीनशे पंचावन्न कोटी पेक्षा अधिक रकमेचा आराखडाही प्रशासकीय अधिकार्यांकडून तयार करून घेण्यात आला. मात्र कोट्यावधीची ही उड्डाणे प्रत्यक्षात न देता केवळ हवेतच विरली व भीमा अनुयायांच्या,तालुकावासियांच्या तोंडाला पाने पुसली गेली.याबाबत तालुकावासियांमध्ये वेळोवेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
डॉ.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उद्याच्या दौर्याची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून तालुक्यातील मौजे शिरगाव येथे राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरण्यास साठी चार हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. त्याच ठिकाणी स्वच्छतागृह व इतर सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. सुरक्षेची अत्यंत चौक व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. श्वानपथक व बॉम्ब शोधक पथक पाचारण करण्यात आले आहे. त्याठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
ज्यांना अधिकृत प्रवेश दिला जाणार आहे, त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आंबडवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला रंगरंगोटी केली गेली आहे. स्मारकाच्या आतील बाजूला नवीन विजेच्या जोडण्या करण्यात आल्या आहेत. तर शिरगाव ते आंबडवे दरम्यान 22 किमीच्या रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता केली जात आहे. रस्त्याच्या बाजू पट्ट्या मातीचे भराव टाकून रेलिंग केली जातायत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची अडचण काढली जात आहे. या दरम्यान सार्वजनिक वाहतुकीसाठी रस्ता पूर्णतःबंद राहणार आहे. मंडणगड नगर पंचायतीचे कर्मचारी शहरातील संपूर्ण रस्ते स्वच्छ करीत आहेत.
आंबडवे येथील महाविद्यालयाच्या इमारतीला,वर्ग खोल्यांना पहिल्यांदा रंगरंगोटी केली जात आहे. आंबडवे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असले तरी आतापर्यंत राजकीय नेत्यांच्या घोषणा वगळता या गावच्या विकासाच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली आहे. अद्यापि हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आणि दुर्लक्षित राहिलेले आहे. या गावात कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक नाही.प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी नाही. तरीही या शासनाच्या इमारतींना रंगरंगोटी केली जात आहे. लोणंद राजेवाडी ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्ग निधी मंजूर होऊन त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे.एकूणच राष्ट्रपती महोदयांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आता तरी महामानवाचे गाव व तालुक्यात विकासात्मक न्याय मिळेल अशी अपेक्षा तालुकावासि व्यक्त करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)