Maharashtra Sex Ratio : राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये गर्भलिंग निदान, गर्भपात होत असल्याचं समोर; आरोग्य विभागाच्या पत्रातील चिंतेचे मुद्दे कोणते?
Prenatal Sex Determination : सांगली, जालना, अहमदनगर, धाराशिव, धुळे, संभाजीनगर आणि नाशिकमध्ये लिंग गुणोत्तर हे 900 च्या आत असून ही स्थिती अत्यंत गंभीर असल्याची चिन्हं आहेत.
मुंबई: पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख सांगितली जाते, महिलांना त्यांचे हक्क देणारं राज्य म्हणून ओळख आहे. पण समोर आलेली एक माहिती महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या (Maharashtra Sex Ratio) चिंता वाटावी एवढी कमी झालेली आहे. राज्यात बंदी असूनसुद्धा गर्भलिंगनिदान (Prenatal Sex Determination) आणि गर्भपात (Abortion) जोरात सुरु असल्याचं हे निदर्शक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या (Maharashtra Health Department Report) पत्रातून ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
विज्ञान, क्रीडा, अवकाश, राजकारण, अर्थ, उद्योग असं कुठलंही क्षेत्र नाही जिथं महिलांनी संधी मिळाल्यावर पुरुषांएवढंच कर्तृत्व दाखवलं नाही. कष्ट आणि सातत्यामध्ये तर महिलांचा कुणी हात धरु शकत नाही. 21 व्या शतकात पुरुषांच्या बरोबरीनं महिला धावत आहेत. तरीसुद्धा समाजातले बुरसटलेले विचार अजून कायम आहेत. मुलगाच हवा हा हट्ट अजूनही जाता जाईना झाल्याचं चित्र आहे.
22 जिल्ह्यांमधील लिंग गुणोत्तर घटलं
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि मुलींचे गर्भपात होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. त्यामुळे या 22 जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरचे प्रमाण म्हणजे एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण चिंतादायकरीत्या घटल्याचे समोर आले आहे. तर जालन्यात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने पाठवलेल्या पत्रात नेमके कोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत ते पाहुयात,
- राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत आहे.
- या जिल्ह्यांमध्ये मुलींचे गर्भपात होत असल्याचे निदर्शनात आले आहे.
- या सर्व प्रकाराची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.
- या सर्व प्रकारानंतर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहे.
- मुलींचे गर्भपात होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ उपायोजना राबवण्यात यावे.
- या प्रकरणात दक्षता घेऊन योग्य ती कारवाई करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा.
राज्यात मुलींचे गर्भपात होत असलेले जिल्हे कोणते आणि कोणत्या लिंग गुणोत्तरची काय स्थिती?
- नाशिक : 1 हजार मुलांमागे 897 मुली
- यवतमाळ : 1 हजार मुलांमागे 893 मुली
- संभाजीनगर : 1 हजार मुलांमागे 883 मुली
- धुळे : 1 हजार मुलांमागे 883 मुली
- अहमदनगर : 1 हजार मुलांमागे 879 मुली
- धाराशिव : 1 हजार मुलांमागे 874 मुली
- सांगली : 1 हजार मुलांमागे 857 मुली
- जालना : 1 हजार मुलांमागे 854 मुली
- सिंधुदुर्ग : 1 हजार मुलांमागे 950 मुली
- गोंदिया : 1 हजार मुलांमागे 947 मुली
- गडचिरोली : 1 हजार मुलांमागे 940 मुली
- अमरावती : 1 हजार मुलांमागे 930 मुली
- रायगड : 1 हजार मुलांमागे 924 मुली
- नागपूर : 1 हजार मुलांमागे 923 मुली
- लातूर : 1 हजार मुलांमागे 918 मुली
- नंदुरबार : 1 हजार मुलांमागे 916 मुली
- सोलापूर : 1 हजार मुलांमागे 911 मुली
- रत्नागिरी : 1 हजार मुलांमागे 911 मुली
- परभणी : 1 हजार मुलांमागे 910 मुली
- नांदेड : 1 हजार मुलांमागे 907 मुली
- भंडारा : 1 हजार मुलांमागे 905 मुली
- अकोला : 1 हजार मुलांमागे 902 मुली
ही बातमी वाचा: