कोरोनाच्या झटपट टेस्टसाठी प्रवरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान; अल्प खर्चात लवकर चाचणी
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर करुन अवघ्या काही सेकंदात कोरोनाबाधित, कोरोना संशयित आणि इतर रूग्णांची वर्गवारी करणं शक्य होणार आहे. प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटनमध्ये स्थित असलेल्या एआय फॉर वर्ल्ड या संस्थांनी परस्पर सहकार्य करार करून ही प्रणाली पुढे आणली आहे.
नाशिक : कोरोनाच्या तपासणीसाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारा मोठा खर्च लक्षात घेऊन केवळ एक्स-रे आणि रक्त चाचणीच्या साह्याने 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' च्या तंत्रज्ञानाचा वापर करुन अवघ्या काही सेकंदात रूग्णांची वर्गवारी करणं शक्य होणारी प्रणाली शोधण्यात आली आहे. या प्रणालीच्या सहाय्याने अगदी कमी वेळात कोरोनाबाधित, कोरोना संशयित आणि इतर रूग्ण अशी वर्गवारी करणं सहज शक्य होणार आहे. ही प्रणाली प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटनमध्ये स्थित असलेल्या एआय फॉर वर्ल्ड या संस्थांनी परस्पर सहकार्य करार करून पुढे आणली आहे.
देशात कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या टेस्ट किट्सची असणारी कमतरता, त्याला लागणारा वेळ, टेस्ट लॅबची क्षमता, कोरोना आणि कोरोना शिवाय इतर आजारांतील फरक ओळखण्यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस काही नवीन तंत्रज्ञान वापरता येईल का? यांचा शोध घेत असतानाच एआय फॉर वर्ल्ड संस्थेचे कार्यकारी संचालक आणि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. वैभव देशपांडे यांच्यासोबत परस्पर सहकार्य करार करून देशात प्रथमचं 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या सहाय्याने प्राथमिक चाचणी करण्याचे तंत्रज्ञान पुढे आणले आहे. अशी माहिती प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे उपकुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा वापर करून आरोग्य क्षेत्रात रोगांचं निदान करण्याची नवीन शाखा विकसित होत आहे. इतर देशांत हे तंत्रज्ञान वापरले जाते, पण आता भारतात या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही सुरू करत आहोत. कोरोनाच्या चाचणीत रुग्णांचा एक्स-रे आणि रक्त तपासणीच्या रिपोर्ट अपलोड केल्यानंतर फक्त पाच सेकंदात संगणकाच्या साह्याने रुग्ण कोविड बाधीत आहे किंवा नाही यांची शक्यता तपासता येते. या प्रणालीचा वापर करून 99.9 टक्के इतके अचुक निदान करणं शक्य आहे. या चाचणीच्या शासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशासाठी या परिस्थितीत या तंत्रज्ञानामुळे मोठी मदत होऊ शकते, अशी माहिती अभिमत विद्यापीठाचे संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. राहुल कुंकुलोळ यांनी दिली आहे.
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा वापर करून भारतात आरोग्य सेवेत हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात कसे वापरता येईल यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठा बरोबर अधिक संशोधन करुन कोरोनासह इतर आजारावरील निदान चाचण्या पुढे आणू असं एआय फॉर वर्ल्ड संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. वैभव देशपांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितले. ही प्रणाली विकसित करण्यासाठी त्यांच्या संघात नेदरलॅडंचे सचिन कुलकर्णी , कॅनडाचे अमित साहु, व युकेचे विधी तज्ञ हिमांशु दासरे यांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय.एम. जयराज, डॉ. सुरेश जंगले ,डॉ. रविंद्र कारले आदी मान्यवर उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बस पाठवणार : अनिल परब
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी वर्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय