शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मोठा निर्णय; थेट हायकोर्टात धाव; तातडीने सुनावणी होणार!
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने नुकताच त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच कोरटकरने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान दिले आहे. दरम्यान, कोरटकरच्या अर्जावर शुक्रवारी (21 मार्च) तातडीची सुनावणी होणार आहे.
प्रशांत कोरटकरने नेमकी काय मागणी केली?
प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामीनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी म्हणजेच 21 मार्च रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. याआधी कोल्हापूर सत्र न्यायालायने त्याचा अटकपूर्व जामीन अज फेटाळला होता. याच निर्णयाला कोरटकरने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचा आरोप आहे. या फोन कॉलची रेकॉर्डिंग सगळीकडे व्हायरल झालेली आहे. याच फोन कॉलमध्ये प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केली. तसेच बोलताना छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यानंतर त्याने न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता.
असीम सरोदे यांनी मांडली बाजू
कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात इंद्रजित सावंत यांची बाजू वकील असमी सरोदे यांनी मांडली होती. सरकारी वकील विवेक शुक्ला यांनीदेखील कोरटकरच्या जामिनाला विरोध केला होता. तर कोरटकरची बाजू वकील सौरभ घाग यांनी मांडली होती.
दरम्यान, आता कोरटकर याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

