बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांची असदुद्दीन ओवेसींना 'मैत्री'ची साद?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी परत एकदा 'एमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींना मैत्रीसाठी अप्रत्यक्षपणे साद घातली आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम आणि दलित मतं एकत्र आली तर 'चमत्कार' होऊ शकतो, असं म्हणत त्यांनी 'एमआयएम'ला अप्रत्यक्षपणे साद घातली आहे.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी परत एकदा 'एमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींना मैत्रीसाठी अप्रत्यक्षपणे साद घातली आहे. बिहार निवडणुकीसाठी ओवेसी सोबत आल्यास निवडणुकीचं चित्रं बदलू शकते, असा आंबेडकरांना विश्वास आहे. आज आंबेडकरांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. बिहार निवडणुकीत दलित, आदिवासी आणि मुस्लीम एकत्र आले तर एनडीएचा पाडाव शक्य असल्याचे आंबेडकर म्हणाले. बिहार निवडणुकीनिमित्ताने देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आंबेडकर म्हणाले.
आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीत एमआयएमसोबत मिळालेल्या यशाचा दाखला देत पुन्हा एकदा बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम आणि दलित मतं एकत्र आली तर 'चमत्कार' होऊ शकतो, असं म्हणत त्यांनी 'एमआयएम'ला अप्रत्यक्षपणे साद घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दुभंगलेली वंचित-एमआयएम आघाडी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत आकार घेण्याची चाचपणी केली जातेय का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत वेगळे झालेले हे पक्ष बिहारमध्ये एकत्र दिसतील का?, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीच प्राथमिक चर्चाही झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडीने ओवेसी यांच्या पक्षासोबत आघाडी केलेली होती. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात असा प्रयत्न परत करु. जे महाराष्ट्रात घडले नाही ते बिहारमध्ये घडवून आणू. बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा एकमेव उद्देश हा आहे की एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे. बिहारमध्ये मुस्लीम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून 40 टक्के समाज आहे. त्यामुळे या सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे." "शिवाय हे सरकार नागरिकता, आरक्षण यांच्याविरोधात आहे," असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
बिहारमधील मुस्लिमांना आंबेडकरांची भावनिक साद आंबेडकरांनी बिहारमधील मौलवी, मौलाना तसेच सुशिक्षित मुस्लीम बांधवांना एकत्र येत आपल्या राजकीय भूमिकेवर विचार करण्याचं आवाहन केल्याचं म्हटलं जात आहे. मुस्लीमांसह दलित आणि आदिवासींना सोबत येत बिहारमधील नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील 'एनडीए' सरकारचा पाडाव करण्याचं आवाहन केलं आहे.
मात्र प्रकाश आंबेडकरांनी नाकारली शक्यता यासंदर्भात 'एबीपी माझा'ने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधला. त्यांनी सध्या अशी कोणतीच शक्यता असल्याचं नाकारलं आहे. सध्या बिहारमध्ये काही लोकांशी चर्चा सुरु आहे. मात्र, यासंदर्भातील अधिकृत भूमिका दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचं आंबेडकर म्हणाले. अलिकडेच बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर बिहारमध्ये जाऊन आले. त्यांना या दौऱ्यात लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्रं पहायला मिळालं होतं.
लोकसभा निवडणुकीत 'वंचित'ची 'एमआयएम'सोबत आघाडी प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी व्यापक राजकीय भूमिका घेत 'भारिप-बहुजन महासंघा'चं विसर्जन करत 'वंचित बहुजन आघाडी'ची स्थापना केली होती. या निवडणुकीत त्यांनी ओवेसींच्या एमआयएमसोबत आघाडी केल्याने राज्याचं राजकीय क्षेत्र ढवळून निघालं. दोघांच्या सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत असल्याने लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच राजकीय पक्षांना घाम फुटला होता. या निवडणुकीत वंचितने 47 जागा लढल्या होत्या. तर औरंगाबादची एकमेव जागा लढणाऱ्या एमआयएमने इम्तियाज जलिल यांच्या रुपाने ओवेसीनंतर दुसरा खासदार महाराष्ट्रातून निवडून दिला. तर या आघाडीने तब्बल 42 लाख मतंही घेत राजकीय जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
विधानसभेत आघाडी तुटली लोकसभेत एमआयएमला औरंगाबादमध्ये यश मिळाल्यानंतर मात्र या दोन्ही पक्षात मतभेद वाढत गेले. विधानसभेत एमआयएमने वंचितकडे 100 जागांची मागणा केली. यात आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील काही जागांचाही समावेश होता. यामुळे हे मतभेद वाढतच गेले. वंचितने एमआयएमला 7 ते 9 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. अखेर तेव्हा प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार इम्तियाज जलिल यांनी आघाडी तोडण्याची घोषणा केली. पुढे ओवेसींनी त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. वंचितला विधानसभेत 28 लाखांच्या जवळपास मतं मिळाली होती. मात्र, त्यांचा एकही आमदार विधानसभेत निवडून आला नाही. मात्र, एमआयएमने मालेगाव आणि धुळ्यातून दोन आमदार निवडून दिले.
महाराष्ट्रात वेगळे झालेले हे दोन पक्ष आगामी बिहार निवडणुकीत एकत्र येतात का?, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. जर हे पक्ष बिहारमध्ये एकत्र आले तर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावरही उमटल्याशिवाय राहणार नाहीत.