Praful Patel : शिंदेंसमोर अनेक अडचणी, आमच्या केसशी संबंध नाही, दादांच्या राष्ट्रवादीचा दावा, शिंदे गटाची अस्वस्थता वाढणार?
Praful Patel On Shivsena Case : नागालँडच्या सर्व आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा असून त्या राज्यातल्या संपूर्ण पक्ष आमच्यासोबत आहे असं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या केसमध्ये अनेक अडचणी आहेत, आमच्या केसमध्ये तसं काही नाही असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सांगितलं. राष्ट्रवादीची केस पूर्ण वेगळी असून त्याचा आणि शिंदेंच्या केसमध्ये (Praful Patel On Shivsena Case ) काडीमात्र संबंध नाही असंही ते म्हणाले. नागालँडच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून तसं प्रतिज्ञापत्र त्यांनी 30 जून रोजीच दिलं होतं अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शिंदे गटाच्या केससंदर्भात केलेल्या दाव्यानंतर मात्र शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याचं दिसून येतंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने 30 तारखेला एक निर्णय घेतला आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी नागालँडच्या आमदारांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला. अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
आमच्यात निवडणुका झालेल्या नाहीत
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे. 53 पैकी 43 आमदार आमच्यासोबत आहेत. विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार सोबत आहेत. नागालँडमधील सर्व आमदार आमच्या सोबत आहेत. जेवढे प्रांताध्यक्ष आहेत ते केवळ नॉमिनेटड अध्यक्ष आहेत. माझ्या सहीने त्यांची नेमणूक करण्यात आलं आहे. पक्षात निवडणुका पार पडलेल्या नाहीत. जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील अध्यक्ष एकत्र मिळून पक्षाचा अध्यक्षाची निवड करतात. आमच्यात निवडणुका झाल्या नाहीत.
शरद पवार गटातील 10 आमदारांच्या विरोधात याचिका
अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या दोन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. पक्ष विरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
शरद पवारांकडील आणखी एक खासदार अजित पवारांकडे
एकीकडे अजित पवार गटाच्या वतीने शरद पवार गटातील आमदारांविरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे शरद पवार गटातील एका खासदाराने आणि एका आमदाराने अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटांमध्ये दहा विधानसभेचे आमदार आणि लोकसभेची एकूण तीन खासदार शिल्लक राहिले आहेत.
ही बातमी वाचा: