![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Chavan suicide case | "माझा मुलगा निर्दोष आहे, हा त्याचा आवाज नाही" , अरुण राठोडच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया
"आमचा मुलगा निर्दोष आहे कोणत्याही राजकीय व्यक्तीशी त्याचा कधीच संबंध आला नाही. केवळ दीड महिन्यांपूर्वीच माझा मुलगा पुण्याला गेला होता.", अशी प्रतिक्रिया अरुण राठोडच्या आईनं दिली आहे.
![Pooja Chavan suicide case | Pooja Chavan suicide case My son is innocent Arun Rathore mothers reaction Pooja Chavan suicide case |](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15225850/Pooja-Chavan-Suicide-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : सध्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. यावरुन राज्याच्या राजकाणातही खळबळ माजली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ज्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. त्या ऑडिओ क्लिपमध्ये कथित मंत्र्यांसोबत एका व्यक्तीचा संवाद आहे आणि तो संवाद पूजा चव्हाण सोबत एकत्र राहणाऱ्या अरुण राठोडचा आहे, अशी चर्चा आहे. अशातच आता अरुण राठोडच्या कुटुंबियांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"आमचा मुलगा निर्दोष आहे कोणत्याही राजकीय व्यक्तीशी त्याचा कधीच संबंध आला नाही. केवळ दीड महिन्यांपूर्वीच माझा मुलगा पुण्याला गेला होता.", अशी प्रतिक्रिया अरुण राठोडच्या आईनं दिली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "एखाद्या कार्यक्रमात राजकीय व्यक्तीसोबत त्याची ओळख झालीही असेल, पण तो केवळ योगायोग असेल."
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील कथित ऑडीओ क्लिप मधील अरुण राठोड हा परळीच्या धारावती तांडा येथील रहिवाशी असल्याचं उघड झालं होतं. तो पूजा पुण्यात राहत असलेल्या फ्लॅटमध्येच राहत असल्याचीही माहिती समोर अली होती. एवढंच नाही तर पूजाच्या आत्महत्येची माहिती अरुणने सर्वात पहिल्यांदा मंत्र्यांना दिली होती, अशी चर्चा आहे.
कोण आहे अरुण राठोड?
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये कथित मंत्र्यांसोबत एका व्यक्तीचा संवाद आहे आणि तो संवाद पूजा चव्हाण सोबत एकत्र राहणाऱ्या अरुण राठोडचा आहे, अशी चर्चा आहे. पण अद्याप तो आवाज अरुण राठोडचा आहे यासंदर्भात कोणतीही खातरजमा झालेली नाही अथवा मंत्रीमहोदय सोबत मध्यस्थी करणारा अरुण होता, या संदर्भात सुद्धा कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, हा अरुण राठोड आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.
पण पूजा चव्हाणच्या एकूण प्रकरणांमध्ये सर्वात वादात अडकलेल्या मंत्री महोदयानंतर दुसरे नाव आहे अरुण राठोडचे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अरुण राठोड कुठे आहे? अरुण राठोडच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी आम्ही थेट अरुण राठोड याचे गाव गाठले.
धारावती तांडा, परळी शहरापासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर असणारा एक छोटासा तांडा. 22 ते 23 वर्षाचा अरुण याच गावामध्ये राहिला. बीएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने फायर ब्रिगेडचा कोर्स केला होता. त्याला त्यामध्ये नोकरीसुद्धा करायची होती.
सोशल मीडियामध्ये आणि एकूण माध्यमांमध्ये अरुण राठोडचे नाव आल्यानंतर गावामध्ये अरुण संदर्भात लोकांमध्ये चर्चा होती. म्हणूनच आम्ही ज्यावेळी गावामध्ये पोहोचलो तेव्हा सारं गाव जमा झाले. गावकऱ्यांसोबत आम्ही अरुणच्या घरी गेलो. पण यावेळी अरुणच्या घरी कुणीही नव्हते.
धारावती तांडावर राहणाऱ्या बहुतेक लोकांचे अरुण सोबत चांगले संबंध आहेत. अरुण असा करू शकतो यावर गावकऱ्यांचा विश्वास नाही. अरुण चांगला मुलगा आहे, त्याचा आणि मंत्रीमहोदयांचा कधीही संबंध आला नाही. याशिवाय तो कधीच राजकीय काम करत नव्हता. आता दीड ते दोन महिन्यापूर्वी अरुण पुण्याला अभ्यासासाठी गेला होता, असे गावकर्यांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)