Sanjay Rathod Live Updates : मंत्रिपदापासून दूर राहून चौकशीला सहकार्य करणार : संजय राठोड
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर विरोधकांसोबत स्वकीयांचाही मुख्यमंत्र्यावर दबाव वाढला आहे. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत राजधर्माची आठवण करुन दिली.
LIVE
Background
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. त्याता आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत राजधर्माची आठवण करुन दिली. मात्र त्यांचं हे ट्वीट कुणासाठी आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!" पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत चाललाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री योग्यवेळी योग्य निर्णय घेतील- संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे स्वराज्याचा राज्यकारभार केला त्याचे आपण पाईक आहोत. सध्याच्या परिस्थितीत राजधर्माचं पालन जर प्रत्येकाने केलं नाही तर हा देश, समाज अडचणीत येईल. महाराष्ट्र धर्म हाच राजधर्म आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन केलं पाहिजे. मात्र तुम्हाला आता जे अर्थ काढायचे ते काढू शकता, असं संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच कुणाला मंत्रिमंडळात ठेवायचं आणि कुणाला मंत्रिमंडळातून काढायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यांच्या हातात राजदंडच असतो. कुणावर अन्यायही करणार नाही आणि न्यायही करणार नाही आणि यालाच राजधर्म म्हणतात, हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील आणि ते कोणत्याही दबावाखाली नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राठोडांच्या राजीनाम्याबाबत भाजप आक्रमक
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्नावर अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप आक्रमक झालं असून राज्यभरात चक्का जाम आंदोलन केलं.