अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयाची EDला नोटीस, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
Anil Deshmukh: अनिल देशमुखांनी नियमित जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आता ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयांने ईडीला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे.
ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुखांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत पुरवणी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरं आरोपपत्र आहे. या आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्यांची दोन्ही मुलं ऋषिकेश आणि सलिल यांच्या नावाचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.
विशेष न्यायालयानं ईडीनं दाखल केलेल्या या आरोपपत्राची दखल घेतलेली नाही. तसेच देशमुख हे 60 दिवसांपासून कोठडीत आहेत, त्यामुळे देशमुखांना डिफॉल्ट जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी देशमुखांनी अर्जातून केली होती. मात्र, तो अर्ज न्यायालयाने 17 जानेवारी रोजी फेटाळून लावला. त्यानंतर आता देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयानं ईडीला नोटीस बजावत बाजू मांडण्याचे निर्देश देत 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून देशमुखांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. तसेच बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोपही देशमुखांवर केला होता. त्यानंतर ईडीने देशमुखांची मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना याप्रकरणी अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली तेव्हापासून अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.
संबंधित बातम्या: