Major Rama Raghoba Rane : 72 तास भुसूरुंग हटवून रस्ता केला अन् जिवंतपणी सर्वोच्च पहिले परमवीर चक्र! मराठमोळ्या मेजर राम राघोबा राणेंची रोमांचकारी गौरवगाथा
Andaman and Nicobar Islands Rename: अंदमान आणि निकोबारमधील (Andaman and Nicobar) 21 मोठ्या बेटांचं नामकरण करण्यात आलं आहे. ही बेटे आता परमवीर चक्र विजेत्यांच्या ( Param Vir Chakra Awardees) नावानं ओळखली जातील. यामध्ये मेजर राम राघोबा राणे (Major Rama Raghoba Rane) यांच्या नावाचा समावेश आहे.
Major Rama Raghoba Rane : केंद्र सरकारकडून अंदमान आणि निकोबारमधील (Andaman and Nicobar) 21 मोठ्या बेटांचं नामकरण करण्यात आलं आहे. ही बेटे आता परमवीर चक्र विजेत्यांच्या (Param Vir Chakra) नावानं ओळखली जातील. यामध्ये 72 तास भूसुरुंग बाजूला करून सैन्यासाठी रस्ता करणाऱ्या पहिल्या 'परमवीर चक्र'ने सन्मानित रणझुंजार मराठमोळ्या मेजर राम राघोबा राणे (Major Rama Raghoba Rane) यांच्याही नावाचा समावेश आहे. मेजर राम राघोबा राणे यांना जिवंतपणी परमवीर चक्र प्रदान (First Living Recipient of Param Vir Chakra) करण्यात आले. असा बहुमान मिळवणारे ते पहिलेच लष्करी अधिकारी आहेत.
जन्मभूमी कारवार आणि अखेरच्या श्वास पुण्यात घेतलेल्या राघोबा राणे यांचा जीवनप्रवास एखाद्या थरारपटाला लाजवेल, इतका रोमांचकारी आहे. तीन दिवस उपाशी राहून त्यांनी मातृभूमीसाठी पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलून देण्याचा पराक्रम राणे यांनी करताना गौरवशाली गाथा रचली. त्यांनी 28 वर्ष लष्करात सेवा बजावली. ब्रिटीश इंडियन आणि इंडियन आर्मीमध्ये ते कार्यरत होते. ते 1968 मध्ये लष्करातून निवृत्त झाले.
बापूंच्या चळवळीत सामील होणार होते
राम राघोबा राणे यांचा जन्म 26 जून 1918 मध्ये कारवार जिल्ह्यातील चेंदिया गावात झाला. त्यांचे वडील पोलीस काँस्टेबल असल्याने बदलीच्या कारणास्तव त्यांचे शिक्षण विस्कळीत झाले होते. वडील पोलीस असल्याने राणेंना बऱ्यापैकी माहिती होती. 1930 मध्ये गांधीजींचे असहकार आंदोलन पाहिले तेव्हा राणे 12 वर्षांचे होते. या चळवळीने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी या चळवळीचा एक भाग बनण्याचा निर्णय घेतला. मात्र, वडिलांना त्यांनी त्यात सहभागी व्हावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी राणेंना त्यांच्या मूळ गावी चेंदिया येथे नेले होते.
वयाच्या 22व्या वर्षी ब्रिटिश इंडियन आर्मीत रूजू
10 जुलै 1940 रोजी 22 वर्षीय राम राघोबा राणे ब्रिटिश भारतीय सैन्यात (Indian Army) दाखल झाले. उत्कटतेने भरलेल्या नोकरीची ही सुरुवात होती, पण देशभक्ती कुठेही कमी नव्हती. त्यांचे शौर्य दुसऱ्या महायुद्धात दिसून आले. जेव्हा त्यांनी म्यानमार सीमेवर जपान्यांना पराभूत केले, पण 1948 मध्ये पाकिस्तानविरोधात लढताना ते परमवीर झाले. शौर्य, देशभक्ती, उत्कृष्ट लढाऊ कौशल्य दाखवले. शत्रूंकडून 72 तास प्रयत्न करत राहिले, पण मेजर राणे हे डगमगले नाहीत.
काय होता तो प्रसंग?
जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमधील झांगर भारतीय सैन्याने 18 मार्च 1948 रोजी घनघोर संघर्ष करून परत मिळवला. मात्र, राजौरीतील पोस्टवर कब्जा कसा मिळवता येईल? हा यक्ष प्रश्न होता. 8 एप्रिल 1948 रोजी चौथी डोगरा बटालियन राजौरीकडे निघाली होती. यावेळी बटालियनने बारवली रिजपासून पाकिस्तानला पिटाळून ताब्यात घेतले. हे ठिकाण नौशेरापासून 11 किलोमीटर अंतरावर होते. पण त्यापुढील मार्गात ब्लॉक्स करून भूसुरुंग पेरण्यात आले होते. त्यामुळे भारतीय सैनिकांचा मार्ग खडतर झाला होता. त्यामुळे लढाऊ टँकही पुढे नेता येत नव्हते. त्यानंतर 37 व्या असॉल्ट फील्ड कंपनीचे सेक्शन कमांडर राम राघोबा राणे डोग्रा रेजिमेंटच्या मदतीला आले.
राम राघोबा राणेंच्या टीमकडून मार्ग मोकळा (Major Rama Raghoba Rane)
राम राघोबा राणे (Major Rama Raghoba Rane) यांनी आपल्या टीमसह मार्ग मोकळा करण्यास सुरुवात केली. मार्गावरील ब्लाॅक्स आणि भूसुरुंग हटवण्यास सुरुवात केली. यावेळी पाकिस्तानने मोर्टार डागले. यामध्ये राणेंचे दोन साथीदार शहीद तर पाच जण जखमी झाले. या घटनेत राम राणेही जखमी झाले, पण राणे आणि त्यांची टीम थांबली नाही. प्रत्युत्तर देत संध्याकाळपर्यंत भूसुरुंग हटवण्यात आले. त्यामुळे टँकना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला, पण मार्ग सुरक्षित नव्हता. ते टँकना वाहून नेण्यासाठी योग्य करावे लागणार होते. मात्र, जिगरबाज राम राणे यांनी रातोरात टँकसाठी मार्ग प्रशस्त केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या विभागाने 12 तास सतत काम करताना भूसुरुंग हटवत मार्ग काढत राहिले.
जखमी होऊनही मार्ग प्रशस्त केला अन् डोग्रा बटालियन 13 किमी पुढे सरकली
भारतीय सैन्याला जाण्यासाठी जो मार्ग सरळ होता, तो वळवळला जात होता. पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार आणि मोर्टारच्या हल्ल्यांना न जुमानता राणे आणि त्यांची टीम काम करत राहिली. 10 एप्रिल रोजी राम राघोबा राणे यांनी पहाटे उठून रस्ता साफ करण्यास सुरुवात केली. दोन तासात त्यांनी मोठा रस्ता मोकळा केला. यादरम्यान पाकिस्तानींनी मोर्टार आणि मशीनगनने हल्ले सुरूच ठेवले. राणेंच्या या कार्यामुळे चौथी डोग्रा बटालियन 13 किलोमीटर पुढे जाऊ शकली. राणे आणि त्यांची टीम भूसुरुंग हटवणे, मार्ग मोकळा करणे आणि ते ठीक करण्याचे काम करत होते. दुसरीकडे डोग्रा रेजिमेंट आणि रणगाडे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत होते.
जीव धोक्यात घालून तीन दिवस रस्त्याचे काम
एका बाजूने उंचीवरून पाकिस्तान्यांकडून थेट रस्त्यावरच हल्ले करत होते. तेव्हा टँकच्या मागे लपलेल्या राम राघोबा राणे यांनी स्फोट करून रस्ता मोकळा केला. रात्र होण्यापूर्वी त्यांनी हे काम पूर्ण केले होते. दुसऱ्या दिवशी 11 एप्रिल रोजी राणे आणि त्यांच्या टीमने पुन्हा 17 तास काम केले. त्यामुळे चिंगास गाठले होते. म्हणजे नौशेरा आणि राजौरी दरम्यानचा मध्यमार्ग. हा जुना मुघलकालीन मार्ग होता. 8 ते 11 एप्रिल दरम्यान केलेल्या रस्त्यांमुळे भारतीय लष्कर राजौरीपर्यंत पोहोचू शकले. यादरम्यान 500 हून अधिक पाकिस्तानी मारले गेले. हजारो जखमी झाले.
राणे यांना 21 जून 1950 रोजी परमवीर चक्र प्रदान
सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे यांना 21 जून 1950 रोजी परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. त्याच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांना लेफ्टनंटपदी बढती देण्यात आली होती. 1954 मध्ये ते कॅप्टन झाले. राणे 25 जानेवारी 1968 रोजी मेजर म्हणून निवृत्त झाले. 1994 मध्ये पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.
इतर महत्वाच्या बातम्या