PM Modi In Maharashtra: महाराष्ट्रात मोदींचा झंझावात, नाशिकमध्ये मोदींचा रोड शो; आठ तासात देणार राज्याला 30 हजार कोटींची भेट
PM Modi In Maharashtra: मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-१चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे.
मुंबई: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज 30 हजार 500 कोटींच्या विकासकामांची भेट महाराष्ट्राला देणार आहेत. ज्याचं स्वरूप सागरी सेतू ते रेल्वेचं जाळं असं आहे. ज्यातून महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आणि दळणवळणाला गती मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याची (PM Modi in Nashik) वेळ बदलली आहे. दुपारी 12.15 ऐवजी मोदी सकाळी 10.15 वाजता नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता रोड शो सुरू होईल. 2 वाजेच्या सुमारास मोदी नाशिकहून मुंबईकडे प्रयाण करतील
सकाळी सव्वादहा वाजता मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांचा रोड शो (PM Modi Road Show) होईल, त्यानंतर ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ते राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईला रवाना होतील. मोदी मुंबईत जवळपास 30 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-1चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा
- सकाळी 10 - नाशिक विमानतळ येथे आगमन
- सकाळी 11 ते 12- काळाराम मंदिर येथे पूजा आणि दर्शन
- दुपारी 12 ते 2 - राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम तपोवन ग्राऊंड, नाशिक
- दुपारी 2 - तपोवन मैदानाकडून हॅलिपॅडकडे
- दुपारी 2.10 नाशिकवरून आयएनएस मुंबईला रवाना
- दुपारी 3.10- आयएनएस शिक्रावरुन एमटीएचएल स्टार्टिंग पॉईंटकडे रवाना
- दुपारी 3.30- एमटीएचएल सागरी सेतूचे उद्घाटन
- दुपारी 4.10 - एमटीएचएलकडून नवी मुंबईकडे प्रस्थाण
- दुपारी 4.15 वाजता- नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ मैदानावरील विविध उद्घाटनाला सुरुवात
- सायंकाळी 5.35 वाजता- नवी मुंबई विमानतळावरून हॅलिपॅडकडे प्रयाण
- सायंकाळी 5.40 वाजता - नवी मुंबई हॅलिपॅडकडून मुंबई विमानतळ प्रयाण
- सायंकाळी 6.10 वाजता मुंबई विमानतळावरुन दिल्लीला रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर (Modi Maidan) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो देखील होणार आहे. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (PM Narendra Modi Road Show in Nashik) आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा रोड शो नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची सर्कलपासून (Mirchi Circle Nashik) ते जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत (Janardhan Swami Math Nashik) होईल. महामार्गावरील एका बाजूने रोड शो तर दुसऱ्या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक या रोड शोला उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुमारे १.२ किमीचे रोड शोचे अंतर असेल.