(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gondia News : नाल्याच्या पुलावर खेळत असताना अचानक तोल गेला, पाण्यात बुडून दोन सख्या चिमुकल्या भावांचा मृत्यू
Gondia Accident News : गोंदिया जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. घरा शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना दोन सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय.
Gondia Accident News : गोंदिया जिल्ह्यातून एक अपघाताची (Accident News) बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा हिरडामाली येथे घरा शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना दोन सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय. नाल्याच्या पुलावर खेळत असताना तोल गेल्याने या दोन चिमुकल्यांचा त्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झालाय. ही घटना आज, शनिवारी उघडकीस आली आहे. राज्यभरात एकीकडे गणेश उत्सवाचा आनंद साजरा करत असताना या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नाल्याच्या पुलावर खेळत असताना अचानक तोल गेला
मिळालेल्या माहितीनुसार हिरडामाली येथे पोंगेझरा देवस्थानाच्या बाजूला एक नाला वाहतो. त्या नाल्यावर पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहत असतं. देवस्थानात राहणारे पुजारी सुजित दुबे यांचे दोघे चिमुकले काल सायंकाळी खेळता खेळता या पुलावर पोहोचले. दरम्यान, पाण्यात खेळण्याचा मोह या चिमुकल्यांना आवरला नाही. यातच पुलाच्या मध्यभागी पाण्यात खेळता खेळता चिमुकल्यांचा पाय घसरल्याने दोघेही चिमुकले पाण्यात वाहून गेले.
चिमुकल्या भावांचा मृत्यूच्या घटनेने कुटुंबियांवर शोककळा
रुद्र सुजित दुबे (वय 3 वर्ष ) आणि शिवम सुजित दुबे (वय 2 वर्ष) दोन्ही राहणार पोंगेझरा हिरडामाली अशी मृतकांची नावे आहेत. काल रात्री गोरेगाव पोलिसात या संदर्भात वडील सुजित दुबे यांनी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही दोघे चिमुकले सापडले नाही. मात्र आज पुन्हा शोधकार्या सुरू असताना दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोंगेझरा हिरडामालीच्या जवळ असलेल्या नाल्यात तरंगताना आढळले. घटनेची नोंद गोरेगाव पोलीसात करण्यात आली आहे. या घटनेने मात्र दुबे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
अंगावर झाड पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यु
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील हलबीटोला ते सुरजाटोला मार्गावर अचानक झाड पडल्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली आहे. दानेश्वर अडले (१९) असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव आहे. मृतक हा आपल्या मित्रा सोबत सालेकसा येथील आदिवासी वस्तीगृहात जात असताना अचानक झाड पडले. यात मोटारसायकल वर मागे बसलेला दानेश्वर अडले याच्या अंगावर हे झाड पडले असून त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला. त्याचा सोबत गाडी चालवित असलेला इश्वर प्रेमलाल उईके (वय १९) हा थोडक्यात बचावला. सदर घटनेची माहिती मिळताच सालेकसा तहसीलदार नरसय्या गोंडागुर्ले घटना स्थळी दाखल झाले. मृतकाला सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करीता पाठविण्यात आले.
हे ही वाचा