(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील पीएफआयच्या निदर्शनातील घोषणाबाजीवरुन नवा वाद.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून कारवाईचा इशारा, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया
Pune PFI protests : पुण्यातील पीएफआयच्या निदर्शनातील घोषणाबाजीवरुन नवा वाद उफाळला आहे.
Pune PFI protests : एनआयएच्या कारवाईच्या विरोधात पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. पुण्यातील पीएफआयच्या निदर्शनातील घोषणाबाजीवरुन नवा वाद उफाळला आहे. राजकीय नेत्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाईचा इशारा दिला आहे. पुणे पोलिसांच्या एफआयआरमध्ये मात्र पाकिस्तान झिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणेचा उल्लेख नाही.
नेमकं प्रकरण काय?
पीएफआयच्या (PFI) पुण्यात झालेल्या बेकायदेशीर आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. ईडी, भाजप आणि तपास यंत्रणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पण समाजमाध्यमांवर पीएफआय कार्यकर्त्यांनी पुण्यातील आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा करण्यात आला. सोशल मीडियावरही असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एफआयआरमध्ये काय?
केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपच्या विरोधात पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. याबाबत पोलिसांनी काही जणांना त्याब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर समोर आली आहे. यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद असा कुठेही उल्लेख नाही. ईडी, एनआयए मुर्दाबाद, पीएफआय जिंदाबाद, भाजप मुर्दाबाद अशी घोषणाबाजी केल्याचं पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटलेय.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा
पुण्यातील पीएफआय आंदोलनातील घोषणाबीजीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्वीट करत म्हणाले की, 'पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत...' 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, कारवाई करू !, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2022
राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया -
पुण्यातील घोषणाबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केलेय.
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. @AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/BB88mEZ8hr
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2022
पीएफआय कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल
अब्दुल कयूम शेख आणि रझी अहमद खान दोघांना दहशतवादी कृत्यांसाठी पैसे पुरवल्याच्या संशयावरुन राज्य दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या अटकेविरोधात पुण्यातील पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. परवानगी नसताना केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी 60-70 पीएफआय कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बंड गार्डन पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.