Pench Collarwali Tigress : पेंचची राणी सुपर मॉम 'कॉलरवाली' वाघिणीचा मृत्यू
कॉलरवाली वाघिणीने देशातील व्याघ्र संवर्धन मोहिमेत अमूल्य योगदान आहे.
नागपूर : भारतातील प्रसिद्ध आजवर 29 वाघांना जन्म देणारी पेंचची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशाच्या सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची प्रसिद्ध वाघिण T-15 च्या मृत्यूने व्याघ्रप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाची शान असलेली ही वाघीण "पेंचची राणी" किंवा "कॉलरवाली" या नावाने ओळखली जायची. विशेष म्हणजे T-15 ने आजवर 29 शावकांना जन्म दिल्याने तिची "सुपरमॉम" या नावाने व्याघ्र प्रेमींमध्ये एक वेगळी ओळख होती. पेंच व्याघ्र प्रकल्पात तिला आणि तिच्या शावकांना पाहण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी असायची. पण वृद्धापकाळाने गेले काही दिवस तिची हालचाल मंदावली होती. अखेर शनिवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
कॉलरवाली वाघीण सतराव्या वर्षी वृद्धापकाळाने थकलेली होती. काही दिवसांपासून मध्यप्रदेश मधील पेंच व्याघ्र प्रकल्पात तिथल्या वन विभागाकडून तिची काळजी घेतली जात असताना शनिवारी सायंकाळी सीताघाट जवळच्या भुरादत्त पाण्याच्या ओढ्याजवळ तिचा मृत्यू झाला. तिच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
पेंच व्याघ्र प्रकल्पात 2005 मध्ये जन्म घेतल्यानंतर तिने 2008 मध्ये पहिल्यांदा तीन शावकांना जन्म दिला होता. पण या शावकांचा अवघ्या एक महिन्याचा कालावधीत मृत्यू झाला. त्यानंतर कॉलरवली वाघिणीने आणखी सात वेळा शावकांना जन्म दिला. तिने ऑक्टोबर 2008 मध्ये चार शावक, त्यानंतर 2010 मध्ये 5 शावकांना एकाच वेळी जन्म देत देशातील व्याघ्र संवर्धनात एक दुर्लभ दुग्धशर्करा योग आणला होता. त्यानंतर 2012 मध्ये तीन शावकांना जन्म दिला. त्यानंतर 2015, त्यानंतर 2017, 2019 यावर्षात ही ती आई झाली... आतापर्यंत 29 शवकांना जन्म देत तिने फक्त सुपर मॉमचा बिरुदच आपल्या नावावर केला नाही.. तर तिने जन्म दिलेले 25 वाघ - वाघीण जंगलात यशस्वी जीवन जगात आहेत. त्यामुळे या कॉलरवाली वाघिणीचा देशातील व्याघ्र संवर्धन मोहिमेत अमूल्य योगदान असून मध्य भारतातील विविध जंगलात पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक वाघांची ही सुपर मॉम नेहमीसाठी अजरामर झाली आहे. कॉलरवाली वाघिणीचे बहुतांशी शावक पेंच व्याघ्र प्रकल्पाचे रुबाबदार वाघ रय्याकसा आणि बीएमडब्ल्यूचे बछडे होते.
कॉलरवाली नाव कसे पडले?
डेहराडूनच्या काही तज्ज्ञांनी 2008 साली या वाघिणीला बेशुद्ध करून तिच्या शरीरात रेडिओ कॉलर ट्रान्सप्लँट केला होता. त्यावरूनच तिचं नाव कॉलरवाली वाघीण असे पडले होते. या वाघिणीचा बाप असलेल्या वाघाला चार्जर या नावाने ओळखले जात असे.
नागपूरचे वाईल्डलाईफ फोटोग्राफर वरून ठक्कर यांनी गेल्या 15 वर्षात सातत्याने सुपरमॉम - कॉलरवाली वाघिणचे फोटो काढले. त्यांनी कॉलरवाली आणि तिच्या 29 शावकांचे फोटो काढण्यासाठी शेकडो दिवस जंगलात घालवले. आज या सुपरमॉम च्या जाण्याने ते ही हळहळले असून कॉलरवाली वाघीण बद्दल अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी ते सांगत आहेत.
संबंधित बातम्या :
Maharashtra Tiger Deaths: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात 23 वाघांचा मृत्यू