व्वा! सरपंच असावा तर असा, अशी केली गावकऱ्यांची दिवाळी 'गोड'
आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे पाटील (Patoda sarpanch Bhaskar Pere Patil)यांनी अख्ख्या गावाची दिवाळी गोड केली आहे. गावकऱ्यांनी कोविडच्या संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जवळ असलेल्या आदर्श गाव पाटोदाच्या सरपंचांनी अख्ख्या गावाची दिवाळी गोड केली आहे. गावकऱ्यांनी कोविडच्या संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे. तीही प्रत्येक कुटुंबाला 25 किलो. आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पाटोदा गावचा आणखी एक नवा गोड आदर्श यानिमित्ताने समोर आला आहे.
औरंगाबाद शहरापासून वीस एक किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. तीन हजार 350 लोकसंख्या असलेल्या गावानं राज्यात आदर्श घालून दिले आहेत.
गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी गावकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे ठरवलं होतं. त्यामुळे संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे. यामुळं गावकऱ्यांना बाजारात 35 ते 40 रुपये किलो मिळणारी साखर वीस रुपयात मिळाली आणि तेही 25 किलो. मग काय गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायलाच नको.
पाटोदा औरंगाबाद जवळ असल्याने अनेक गावकऱ्यांची उपजीविका शहरावर अवलंबून आहे. कोविडचं संकट आल्यानं गावची अर्थव्यवस्थाही बिघडली होती. त्यामुळे दिवाळी कशी करायची असा अनेक गावकऱ्यांना समोर प्रश्न होता. आता त्यातच वीस रुपये किलो साखर मिळाल्यानं बायाबापड्या म्हणत आहेत की, आता दोन नाही चार गोड पदार्थ करायचे.
गावात अनेक उपक्रम आधीच राबवले आहेत. गावकऱ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, टॅक्स भरणाऱ्याला दळण फुकट, शेवया, कुरडया, पापड आणि डाळ फुकट करून मिळतात. गावातले रस्ते चकाचक, गावात सीसीटीव्हीचे कवच असे अनेक आदर्श आहेत.
भास्कर पेरे म्हणाले की, कोविडचं संकट गावपातळीवर ही आहे. त्यामुळे गावकर्यांची दिवाळी गोड करण्याबाबत आम्ही चर्चा करत होतो. त्यात एक प्रस्ताव पुढे आला की सवलतीच्या दरात साखर दिली जावी. काही कारखान्यांशी आम्ही संपर्क केला. त्यातून लातूरच्या एका कारखान्याने आम्हाला सवलतीच्या दरात म्हणजे 30 रुपये किलो साखर देण्याचे ठरवले. मग आम्ही ही ग्रामपंचायत म्हणून त्यातील काही भार उचलण्याचा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांना 20 रुपये किलोने साखर देण्याचे एक मताने ठरवलं. कोविडीच्या संकटात ग्रामपंचायतीचा कर जर गावकऱ्यांनी भरला असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पाहिला पाहिजे यातून ही संकल्पना पुढे आल्याचं भास्कर पेरे सांगतात.
लोकांच्या पैशातूनच ही साखर दिली आहे. ग्रामपंचायतला जो पैसा जमा झालाय तो लोकांचा पैसा आहे. यावर्षी 500 रुपयात 25 किलो दिली आहे.पुढच्या वर्षी 25 किलो साखर मोफत देणार असल्याचं भास्कर पेरे यांनी सांगितले. गावकऱ्यांना पैशात किती नफा झाला हे महत्त्वाचं नाही,त्याची दिवाळी गोड होतेय याचा चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो हे महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले.
गावातील सत्तर वर्षाच्या कलाबाई मुचक म्हणाल्या की, सरपंच म्हणजे शंभर नंबरी सोनं 10 गावात सापडणार नाही. सुमनबाई जाधव म्हणतात यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
VIDEO : सरपंच असावा असा! विकसित गावासाठी पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं विशेष पॅटर्न!