Panvel News : पनवेलमध्ये राष्ट्रवादी आणि शेकापला धक्का, जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
Panvel News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि शेकापचे नेते अर्जुन डांगे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केलाय.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून शिवसेनेला (Siv Sena) धक्क्यावर धक्के देत असताना शिंदे गटाकडून आता महाविकास आघाडीला देखील जोरदार धक्का दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. याबरोबरच शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे येथील शेकापचे नेते अर्जुन डांगे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचा गटाला समर्थन देत लाल बावट्याची साथ सोडली आहे. पनवेल संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील झाले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. गेल्याच महिन्यात पनवेलमध्ये शिंदे गटाकडून मनेला खिंडार पाडण्यात आलं होतं. पनवेल, उरणमधील नाराज मनसैनिकांनी मागच्या महिन्यात शिंदे गटात प्रवेश केला होता. पनवेलमधील मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब , यांच्यासह उरण तालुका उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, कामगार सेनामधील पदाधिकारी, उपशहर प्रमुखसह पूर्ण मनसे खारघर मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिंदे गटात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला होता. त्यावेळी पनवेल, उरण मधील मनसेच्या जवळपास शंभर पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि शेकापमधील माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांन देखील शिंदे गटात प्रवेश केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी शिंदे गटामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा धक्का मानला जात आहे. कारण पनवेलमध्ये आधीच महाविकास आघाडीची शक्ती कमी आहे. त्यातच आता शिंदे गटामध्ये होणाऱ्या इनकमिंगमुळे महाविकास आघाडी पनवेलमध्ये अजूनच कमकुवत होणार आहे.
शेकापच्या डांगे यांच्यावर शहर उपाध्यक्षाची जबाबदारी होती. शिवाय पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक थोरात यांनी स्थानिकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे खांदेश्वर वसाहतीसमोरील उड्डाणपूल आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न सुटला आहे. शिवाय दुधविक्रीतून स्थानिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अभ्यासू नगरसेवक म्हणून थोरात यांची ओळख आहे. त्यामुळेच राऊत आणि थोरात यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे पनवेलमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे. तर त्याउलट राष्ट्रवादीची ताकद आता पहिल्यापेक्षा कुमकुवत होणार आहे.