दोन वर्ष टाळ कुटत होते का?, पंकजा मुंडेंची टीका; विधानसभा राखता आली नाही म्हणत धनजंय मुंडेंचा पलटवार
Pankaja Munde vs Dhananjay Munde : पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. प्रचारसभा दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेंकावर टीकास्त्र सोडलं.
Pankaja Munde vs Dhananjay Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. प्रचारसभा दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेंकावर टीकास्त्र सोडलं. दोन वर्ष काय टाळ कुटत होते का ? तुम्ही 32 व्या नंबरचे मंत्री आहात, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनजंय मुंडे यांच्यावर केली. या टीकेला धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. चार चार खाती सांभाळून सुद्धा विधानसभा राखता आली नाही, त्यांनी आमची कुवत विचारणे हास्यास्पद आहे, असं धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांच्या टीकेला उत्तर दिलं.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
दोन वर्ष काय टाळ कुटत होते का ? तुम्ही 32 व्या नंबरचे मंत्री आहेत, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर प्रचारसभेत केली. यावेळी त्यांनी 100 कोटीची घोषणा केली, पाच नगरपंचायतला 500 कोटी आणणार. असं विधान धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केलं होतं. या विधानाचा पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला. याला जेलमध्ये घालू त्याला जेलमध्ये घालू सगळ्याना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का ? कुणाचं घर बरबाद करायचं, असं राजकारण मुंडे साहेबानी शिकवलं नाही, असेदेखील पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत प्रचाराच्या सभेत त्या बोलत होत्या.. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर , माजी आ.आर टी देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणतेच स्टेटमेंट नाही. कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकाने चालली पाहिजे. असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटते, असेही त्या म्हणाल्या. यांचं भविष्य फार चांगलं नाही यांचा कबाडा होणार आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे 32 नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे सामाजिक न्याय विभागाला कमी लेखले होते, याचाच संदर्भ घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 'आम्हाला कुणी नाव ठेवत आहे, आमची कुवत काढली जात आहे, आम्ही गरीब माणसं आहोत. पण ज्यांनी पूर्वी 4-4 खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना 32 हजाराने नाकारले, त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. केज नगरपंचायत निवडणुकी अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची केजमध्ये सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
केज नगर पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची अजब युती असून, इथे भाजप आमदार, भाजप खासदार, राष्ट्रीय नेते असूनही केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा कमळ चिन्ह असलेला एकही उमेदवार रिंगणात नाही, हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापर्यंत कुणीतरी पोहचवा, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.