(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaja Munde: दोन महिन्यांच्या 'राजकीय ब्रेक'नंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय, राज्यभरात अकरा दिवसांचा दर्शन दौरा
Pankaja Munde : पंकजा मुंडे या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत.
बीड : सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे ब्रेकवर गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय घडामोडीपासून त्या पूर्णपणे दूर गेल्या होत्या. दरम्यान आता दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे. कारण पुढील महिन्यात पंकजा मुंडे यांच्याकडून शिवशक्ती यात्रा काढली जाणार आहे. या अकरा दिवसांच्या दौऱ्यात त्या राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील देवदर्शन करणार आहे.
गेल्या दोन महिन्यापासून सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. या दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास पंकजा मुंडे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर,पुणे, सातारा., कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शनासाठी पंकजा मुंडे दौऱ्यावर जाणार आहेत.
पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी आणि त्यासोबत शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेच्या दर्शनासाठी असल्याने हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जात आहे. पण, दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करतील का? असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या या दर्शन दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे घेतला होता 'राजकीय ब्रेक'
राज्यात सध्या फोडाफाडीचे राजकारण आणि अनपेक्षित घडामोडीमुळे वातावरण ढवळून निघाले आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी अशा राजकारणाचा कंटाळा आला असल्याचे स्पष्टपणे बोलावून दाखवले आहे. दरम्यान याच राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानुसार पंकजा मुंडे मागील दोन महिन्यांपासून राजकारणापासून पूर्णपणे दूर होत्या. या काळात त्या माध्यमांपासून देखील दूर होत्या. मात्र आता दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे सक्रिय होत आहे.
राजकारणात कधी सक्रिय होणार?
दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या पंकजा मुंडे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये देवदर्शन दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ब्रेकवरुन परतलेल्या पंकजा मुंडे राजकारणात कधी सक्रिय होणार?, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे.
संबंधित बातम्या: