Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणीच्या अनमोल अन् मौल्यवान दागिन्यांना झळाळी; मूल्यमापनास सुरुवात, दागिन्यांचाही इन्शुरन्स
पंढरपूरच्या विठ्ठाल रुक्मिणीच्या खजिन्यात अतिशय अनमोल आणि जगात कुठेही न आढळणारे दुर्मिळ दागिने आहेत. दरम्यान, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या तज्ञांकडून या दागिन्यांच्या मूल्यमापनास सुरुवात झालेली आहे.
सोलापूर: समस्थ महाराष्ट्राचे आणि वारकऱ्यांचे दैवत म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुराया आणि माता रुक्मिणीच्या खजिन्यात (Pandharpur Vitthal Temple) अतिशय अनमोल आणि जगात कुठेही न आढळणारे दुर्मिळ दागिने आहेत. दरम्यान, आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या तज्ञांकडून या दागिन्यांच्या मूल्यमापनास सुरुवात झालेली आहे. इंग्लंडची राणी आणि कुवेतचा राजा यासह देशातील अनेक मोठमोठ्या मंदिरातील अनमोल दागिन्यांचे मूल्यमापन केलेले अनुभवी तज्ञ पुरुषोत्तम काळे यांच्याकडून विठुरायाच्या (Pandharpur News) दागिन्याचे मूल्यांकन सुरू करण्यात आल आहे. हे सर्व दागिने इसवी सन 500 ते 1892 या कालावधीतील असून असे दागिने जगात कोठेही उपलब्ध नसल्याचा दावा मूल्यांकन करते पुरुषोत्तम काळे यांनी केला आहे.
मूल्यमापनानंतर दागिन्यांचा इन्शुरन्स
विठ्ठल रुक्मिणीच्या या अनमोल दागिन्यांचे पहिल्यांदाच मूल्यांकन होत असून हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. हे अतिशय पुरातन असणारे दागिने व्यवस्थित जतन करून ठेवण्यात येत असले तरी यापूर्वी त्याचे कधीही मूल्यांकन झालेले नव्हते. आता या दागिन्यांच्या मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे. हे मूल्यांकन पूर्ण होण्यास पुढील दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. एवढे मौल्यवान दागिने विठुरायाच्या खजिन्यात असून खबरदारी म्हणून त्याचे मूल्यांकन करून या दागिन्यांचा विमा उतरवला जाणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
कोण आहेत पुरुषोत्तम काळे?
पुरुषोत्तम काळे यांनी यापूर्वी तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, मुंबईचा जीएसबी गणपती, वडाळ्याचे विठ्ठल मंदिर अशा अनेक देवस्थानातील मौल्यवान दागिन्यांचे मूल्यमापन केले आहे. याशिवाय इंग्लंडची राणी आणि कुवेतचा राजा यांच्याकडे असणारे पुरातन व मौल्यवान दागिन्यांचे मूल्यमापन ही काळे यांनी केले असून त्यांना याचा गाढा अभ्यास आहे. काळे हे शासनाच्या अधिकृत मान्यता प्राप्त मूल्यमापनकार असून ते आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दागिन्याचे मूल्यमापन करत आहेत.
13 व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंतचे 325 अतिशय पुरातन, मौल्यवान दागिने
विठुरायाच्या खजिन्यात तेराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत जवळपास 325 अतिशय पुरातन व मौल्यवान दागिने असून यातील काही दागिने हे शिंदे-होळकर यांच्यासारख्या राजघराण्यातून अर्पण केलेले आहेत. मंदिर समितीचे सराफ खजिना विभाग आणि व्यवस्थापकांच्या उपस्थितीत हे मूल्यमापनाचे काम सुरू असून लवकरच या अनमोल दागिन्याचे मोल निश्चित करण्याचे काम काळे हे करणार आहेत. अगदी संतांच्या अभंगात आलेले कौस्तुभ मनासारखे अनमोल हिरे आणि दागिने हे देवाच्या खजिन्यात असून अशा विविध पद्धतीचे मौल्यवान हिरे माणिक पाचू मोती हे आता जगात कोठेही पाहायला मिळत नसल्याचे काळे यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा