(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पंढरीचे विठ्ठल मंदिर बुद्ध विहार!' अभ्यासकाच्या दाव्यानंतर वारकरी संप्रदाय संतप्त, इतिहास अभ्यासकांनी खोडला दावा
Pandharpur Vitthal Mandir विठ्ठल मंदिर हे मूळ बौद्ध विहार असल्याचा दावा नागपूर येथील अभ्यासक प्रमोद आगलावे यांनी केला आहे. यानंतर वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तात संतापाची लाट उसळली आहे.
Pandharpur Vitthal Mandir News : लाखो करोडो विठ्ठल भक्त आणि वारकऱ्यांचे आराध्य असलेले विठ्ठल मंदिर हे मूळ बौद्ध विहार असल्याचा दावा नागपूर येथील अभ्यासक प्रमोद आगलावे यांनी केला आहे. यानंतर वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तात संतापाची लाट उसळली आहे. तसे पहिले तर वारकरी संप्रदायाचा इतिहास बाराव्या शतकापासून सुरु झाला पण त्याही पूर्वी हे विठ्ठल मंदिर होते. भाविक येथे दर्शनाला येत असल्याचा दावा वारकरी संप्रदायाकडून केला जातो. मात्र आगलावे यांच्या अभ्यासानुसार याही पूर्वी आठव्या ते नवव्या शतकात येथे बौद्ध विहार होता आणि त्याचेच मंदिर झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हा संपूर्ण दावा केवळ सवंग लोकप्रियतेसाठी
हा संपूर्ण दावा केवळ सवंग लोकप्रियतेसाठी केला जात असल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून येऊ लागल्या आहेत. ज्येष्ठ वारकरी संत बद्रीनाथ महाराज तनपुरे , ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , जोगदंड महाराज यांनी आगलावे यांचा दावा खोडून काढला आहे. वारकरी संप्रदायाचे प्रमाण हे संतवचने आहेत आणि आमच्या संतांनी हा विठ्ठल वारकऱ्यांचा असल्याचा दावा वारकरी संत करीत आहेत. हिंदू धर्मात विष्णूचा नववा अवतार हा बुद्धांचा मानला जातो आणि त्यातूनच अशी वक्तव्य समोर येत असतील असा दावा वारकरी संत करीत आहेत. अशा पद्धतीचा बुद्धिभेद कोणीही करण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी संप्रदाय याला किंमत देत नसल्याची प्रतिक्रिया बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी दिली आहे.
विठ्ठल सर्व जाती धर्माच्या संतांचे आराध्य दैवत
विठ्ठल हा सर्व जाती धर्माच्या संतांचे आराध्य असल्याने चातुर्वर्ण चौकात मोडून समतेचा संदेश या वारकरी संतांनी दिला. मात्र हे तत्वज्ञान बुद्धांच्या तत्वज्ञानाजवळ जाणारे असल्याचा दावा अभ्यासक सचिन परब यांनी केला आहे. तर पंढरपूरचाच इतिहास पाचव्या शतकापासून असून येथे मंदिर अथवा मूर्तीमध्ये हे बौद्ध विहार असल्याचा कोणताही पुरावा सापडत नसल्याचा दावा पंढरपूरच्या इतिहासाचे अभ्यासक अॅड धनंजय रानडे यांनी केला आहे.
विविध विचारधारांना विठुराया कायम आपला वाटत आला
यावेळी पाचव्या शतकापासून असलेले विठ्ठल मूर्ती आणि मंदिरातील तांबरलेख शिलालेख याचे त्यांनी दाखले दिले. हे सर्व लोकप्रियतेसाठी सुरु असून पूर्वी अशाच एका अभ्यासकाने हाच दावा केला होता. मात्र तो दावा त्यावेळी खोडून काढला होता असे रानडे यांनी सांगितले. एकंदर महानुभाव पंथ असो, जैन संप्रदाय असो, बुद्ध संप्रदाय असो, सुफी संप्रदाय असो अथवा लिंगायत संप्रदाय असो या विविध विचारधारांना विठुराया कायम आपला वाटत आला आहे आणि हेच या लोकदेवाचे वैशिष्ट्य आहे. यावरून काहीजणांना वाद निर्माण करायचा असेल तर त्याला भारत सरकारचा संशोधन विभाग उत्तर देईल मात्र विठुरायावर जीवापाड प्रेम करणारा विठ्ठलभक्त अशा कोणत्याही दाव्याचा कधीच स्वीकार करणार नाही एवढे नक्की.