काय म्हणताय... विठुराया सुट्टीवर! मार्गशीर्ष महिनाभर देवाचा मुक्काम पोस्ट विष्णुपद
Pandharpur Vitthal Mandir :विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे. मार्गशीर्ष महिना हा देवाचा विश्रांती काळ असून चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर देव सुट्टीसाठी येत असतो.
Pandharpur Vitthal Mandir : खरंतर व्यस्त दैनंदिनीतील थकवा घालवण्यासाठी सर्वच जण विश्रांतीसाठी निसर्गरम्य ठिकाणच्या शोधात असतो. प्रत्येकाला फक्त मानसिक शिणवाटा घालवण्यासाठी शांतता हवी असते. हीच अवस्था देवाची देखील होत असेल का? त्यामुळेच सध्या विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही पाळली जाते. मार्गशीर्ष महिना हा देवाचा विश्रांती काळ असून चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर देव सुट्टीसाठी येत असतो. आषाढी यात्रा नंतरचा चातुर्मास आणि नंतर आलेली कार्तिक यात्रा यामुळे शिणलेला विठुराया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतीक्षेत असतो आणि हेमंत ऋतूचे वेध लागताच देवालाही विष्णुपदावर येण्याची ओढ सुरु होते. यंदा कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी ओमायक्रोनच्या धोक्यामुळे विष्णुपदावर येताना प्रत्येकाची तापमान चाचणी घेऊन आणि सॅनिटायझर मारूनच भाविकांना सोडले जात आहे.
पंढरपुरपासून दोन किलोमीटर अंतरावर हे विष्णुपद नावाचे असेच एक निसर्गरम्य ठिकाण आहे. विठ्ठल मंदिराकडून गोपाळपुराला येताना रस्त्यापासून आतल्या बाजूला दाट झाडीत चंद्रभागा तीरावरील या मंदिराला बहुसंख्य पर्यटक हे नदीमार्गे होडीतून येतात. पुंडलिक मंदिरापासून रोज अनेक होड्या दिवसभर पर्यटकांना नौकानयनाच्या आनंदसह देवाच्या विश्रांती ठिकाणी नेत असतात. गेली शेकडो वर्षांपासून दरवर्षी कार्तिक वद्य अमावास्येला विठुराया येथे सुट्टीवर येतात आणि तब्बल महिनाभर विश्रांती घेऊन मार्गशीर्ष वद्य अमावास्येला पुन्हा वाजत गाजत मंदिराकडे परततात.
चंद्रभागेच्या पाण्यातून प्रवास करीत या मंदिराकडे येताना वाटेत पात्राच्या माढ्यातच पाण्यात अर्धवट बुडालेले नारदमुनींचे बैठेखानी लहानसे मंदिर लागते. या मंदिरात पद्मासन घातलेली नारदमुनींची पुरातन मूर्ती आहे. विष्णुपदाला जाण्यापूर्वी सर्व भाविक होडीतुनच नारदमुनींचे दर्शन घेऊन पुढे प्रवास करतात. नारदमुनींच्या मंदिराबाबतही भाविकांच्या विविध प्रकारच्या आख्यायिका असून देव आणि रुक्मिणी मातेचे भांडण लागल्यामुळेच विठुरायाने नारदाला नदीच्या पात्रात बसविले असून सहा महिने ते पाण्याबाहेर आणि सहा महिने पाण्यात असते. नारदांच्या मंदिराच्या पुढे येताच विष्णुपदाचे दगडी मंदिर दिसू लागते.
पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेला नदीतच पाऊण किलोमीटर वर हे मंदिर चंद्रभागा आणि पुष्पावती या नद्यांच्या संगमावर आहे. विष्णुपदाचे मुख्य मंदिर इ.स.1640 साली कोणी धामणगावकर बुवा यांनी बांधले असून 1785 साली चिंतो नागेश बडवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे पूर्णतः काळ्या पाषाणातील असून चारी बाजूला मोकळ्या कमानी आणि मध्यभागी भगवान श्रीविष्णूंचे जवळपास तीन-साडेतीन फुटांचे पाऊल आहे. याठिकाणी देव गोपालक आणि आपल्या गाईंसमवेत येऊन क्रीडा करीत असल्याच्या आख्यायिका असून येथील दगडावर अनेक ठिकाणी गाईच्या आणि गोपालकांच्या पायाच्या आकाराच्या खुणा दगडात तयार झालेल्या आहेत.
मध्यभागी देवाचे समचरण, बासरी, काठी आणि गोपाळकाल्याच्या भांड्याच्या खुणा दगडात दिसतात. मंदिराच्या चार पायऱ्या उतरून खाली असलेल्या दगडी ओट्यावर शेकडो वर्षांपूर्वीची प्रताप मारुतीची मूर्ती आहे. होडीतून देवाच्या विश्रंतीस्थानावर प्रवेश करताच प्रत्येक जण या ठिकाणच्या प्रेमात पडतो. एका बाजूला चंद्रभागा तर दुसऱ्या बाजूला पसरलेली हिरवळ, पक्षांच्या किलबिलाटाशिवाय कसलेली आवाज नाहीत त्यामुळे देवाला खऱ्या अर्थाने येथे शांती आणि समाधान मिळत असल्यानेच देव अशा निवांतस्थळी सुट्टीवर येत असावा. मात्र भाविक आणि पर्यटक देवाला एकटे सोडायला तयार नसल्यानेच महिनाभर विठ्ठल मंदिराप्रमाणेच विष्णुपदावरही देवाला भक्तांच्या गर्दीला सामोरे जावेच लागते.
विठुरायाचे मंदिरातून विष्णुपदावर आल्याने देवाचे मंदिरात होणारी नित्यपूजा , धुपारती , शेजारती , सकाळच्या खिचडीचा , दुपारचा महानैवेद्य आणि रात्रीचा बालभोग नैवेद्य याच ठिकाणी दाखविले जातात . देव विश्रांतीसाठी आले कि भक्तही त्याच्या पाठोपाठ येथे पिकनिकसाठी येत असतात तेही सोबत जेवणाचे डबे घेऊन येथे गोपाळकाल्याच्या आनंद घेतात. वारकरी आणि पर्यटक महिला येथे देवासमोर फेर धरून अभंग गाऊन आणि नाचून आपला आनंद व्यक्त करीत असतात. एकंदर सुट्टीवर आलेल्या देवाला येथेही भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे मनासारखा विश्रांती घेत येत नसला तरी भाविक मात्र येथे येऊन दर्शन घेण्यास पर्वणी मानतात. याच मंदिराच्याकडून पायऱ्या चढून गोपाळपूर रस्त्याकडे जाताना वाटेतच संत जनाबाईचे मंदिर असून याच ठिकाणी जनाबाईला सुळावर चढवले असता त्या सुळाचे पाणी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते . एका बाजूला देव महिनाभर येथे राहणार असल्याने प्रशासनाने मंदिर परिसरात स्वच्छतेची काळजी घेतली असली तरी चंद्रभागेच्या दुरवस्थेमुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य झाले आहे. असो मंडळी तुम्ही देखील विठ्ठल दर्शनासाठी येणार असाल तर विठ्ठल मंदिरात जावंच पण सध्या देवाचा महिनाभरासाठी बदलेल पत्ता मुक्कामपोस्ट विष्णुपद हा आहे हे ध्यानात ठेवा म्हणजे झाले.