ABP Impact : चंद्रभागेतील दूषित पाण्यापासून वारकऱ्यांची सुटका, नवीन पाणी सोडलं; पवित्र स्नानाचा आनंद
Pandharpur News Updates ABP Impact : चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था केली आहे. आज माघ दशमी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
Pandharpur News Updates ABP Impact : पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या दूषित पाण्यामुळे भाविकांना त्वचा रोग होऊ लागल्याच्या तक्रारी आल्यानंतर ABP माझाने ही भीषण अवस्था दाखवली होती. यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने आदेश देत चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था केली आहे. आज माघ दशमी असून यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.
विठ्ठल दर्शनापूर्वी पवित्र चंद्रभागा स्नानाची परंपरा वारकरी संप्रदायात असल्याने हजारो भाविकांनी आज या शुद्ध पाण्यात स्नानाचा आनंद घेतला. चंद्रभागेवरील गुरसाळे बंधाऱ्यातून काल सायंकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पूर्वीचे प्रदूषित झालेले अळ्यायुक्त पाणी आता वाहून गेले असून त्याठिकाणी हे नवीन पाणी पोचल्याने भाविकांना चांगल्या पाण्यात स्नान करता येत आहे.
सध्या एसटीचा संप अजूनही संपला नसल्याने यंदा कार्तिकी वारी प्रमाणे माघी यात्रेवरही परिणाम होईल असे वाटत असताना आज हजारोंच्या संख्येने भाविक मिळेल त्या वाहनाने पंढरपूरमध्ये पोहोचले आहे.
पंढरपुरात येणाऱ्या रस्त्यावर शेकडो पायी दिंड्या हरिनामाचा गाजर करीत पोहोचत असून विठ्ठल दर्शनाच्या रांगेत आज एक लाख भाविक उभे आहेत. देवाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून गोपाळपूर मार्गाकडे गेली असून दर्शनाला आठ ते दहा तासांचा वेळ लागत आहे.
माघी यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल
उद्या पहाटे विठूरायाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य अतुल महाराज भगरे गुरुजी यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची पूजा कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पार पडणार आहे. माघी यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल झाला आहे. विठ्ठल मंदिर , प्रदक्षिणा मार्ग , चंद्रभागा वाळवंट आणि दर्शन रांगेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha