Pandharpur Ashadi Wari 2021 : पायी आषाढी वारीला बायोबबल नियमांनुसार परवानगी द्या; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Pandharpur Ashadi Wari 2021 : पायी आषाढी वारीला बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
पंढरपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यंदाच्या पायी आषाढी वारीला बायो बबल नियमांनुसार, परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. एकीकडे वारकरी संप्रदाय पायी वारी आणण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे आळंदी किंवा पालखी मार्गातील इतर काही गावातील ग्रामस्थांनी पायी वारी नको, असा आग्रह धरला आहे. दरम्यानच्या काळात वारकरी संप्रदायानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं आहे.
कोरोनाचे वाढते संकट, रोज सापडणारे नवनवीन स्ट्रेन, तिसऱ्या लाटेचा दिलेला इशारा अशा परिस्थितीत आषाढी पायी वारीला नागरिक आणि प्रशासनाकडून टोकाचा विरोध सुरु झाला आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बायोबबलमध्ये पायी वारीला परवानगी देण्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी मनुष्यहानी झाली आहे. अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याचे सत्र सुरु आहे. अशावेळी यंदाही गेल्यावर्षी प्रमाणे आषाढी यात्रेला येणारे पालखी सोहळे बसमधून आणण्याची मागणी पंढरपूर, आळंदी येथील नागरिकांसह पालखी मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनानेही यंदा पायी वारीबाबत ठाम आणि कठोर भूमिका घेत पायी वारील विरोध केला आहे. मात्र वारकरी संप्रदाय पायी वारीसाठी ठाम असल्याचे चित्र आहे. वास्तविक वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही पायी वारी संदर्भात मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालखी सोहळा आणि देवस्थान प्रतिनिधींशी बैठकीत चर्चा करून पायी वारीचे धोके संप्रदायाला दाखवून दिले आहेत. असे असताना वारकरी संप्रदायाने मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा पायी वारीची मागणी केली होती.
वारकरी संप्रदायाने मुक्काम कमी करायची आणि कोरोनाचे नियम पाळत अत्यंत मर्यादित संख्येने पायी वारी करण्याची तयारी दर्शवत पायी वारीसाठी शासनाकडून परवानगी मिळवून देण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती. यामध्ये मर्यादित वारकरी संख्येत, पालखी मुक्कामाची स्थळे कमी करून आणि त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची तयारी असल्याचे वारकऱ्यांनी सांगत बायोबबलसह विविध प्रस्ताव दिले आहेत. याशिवाय गरज भासल्यास श्रींच्या पादुका आणि पालखी रथ ऐवजी बंदिस्त वाहनातून नेण्याची तयारी दाखवली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी पालखी सोहळा हा महाराष्ट्राची प्राचीन परंपरा असून एका अत्युच्च अध्यात्मिक सोहळ्याची अनुभूती देणारा क्षण आहे. वारी वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. अशा पायी वारीला जैव सुरक्षा (बायोबबल) कवचामध्ये सोहळा पार पडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विरोधी पक्षनेत्यांना राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती आणि धोका माहीत आहे. यातच पंढरपूरमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमुळे झालेली भीषण अवस्था देखील त्यांना माहीत असताना पुन्हा पायी वारीला परवानगी मागितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा मागणीमुळे अजून किती नागरिकांचे प्राण धोक्यात घालायचे, याचा विचार संयमी आणि अभ्यासू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी अपेक्षा आळंदी , पालखी मार्गावरील गावे आणि पंढरपूरकरांनी करत आहेत.
'आषाढी वारी पायी नको', आळंदी ग्रामस्थांचा विरोध
यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याचं स्वरूप कसं असेल, याचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. राज्यातील नऊ पालखी सोहळा प्रमुखांनी पायी वारीचा प्रस्ताव ठेवलाय. पण देवाच्या आळंदीतील ग्रामस्थांनी मात्र याला विरोध दर्शविला आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करायचं नसेल तर एसटीतूनच हा सोहळा पंढरपूरला नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पहिल्या लाटेत दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमधून तबलिकी समाज कोरोनाला घेऊन देशात विखुरला तर दुसऱ्या लाटेत कुंभमेळा आणि निवडणुकांमुळे देशात कोरोना फोफावला.यामुळे अनेकांचे सगेसोयरे तर गेलेच, सोबत देशातील लाखो नागरिकांचे बळी देखील गेले. अशात आषाढी पालखी सोहळा पायी नेण्याची मागणी केली जात आहे.
पायी वारीत कोरोनाने शिरकाव केला आणि त्यानंतर वारकरी आपापल्या घरी पोहचले तर याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला ते भोगावे लागतील. आदर्श समाज रचना, विश्वशांती, सामाजिक सलोखा अशी संतांची शिकवण आहे. पण पायी वारीच्या चुकीच्या अट्टाहासाने कोरोना फोफावला तर संतांच्या या शिकवणीला तडा जाईल. शिवाय अखंड वारकरी संप्रदायाची अवहेलना आणि बदनामी ही होईल. हे टाळायचं असेल तर एसटीतून हा सोहळा पंढरपूरला पाठवावा, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pandharpur Ashadi Wari 2021 : 'आषाढी वारी पायी नको', आळंदी ग्रामस्थांचा विरोध