2100 रुपयाच्या चार चांदीच्या कॉईनसाठी ट्रिपल मर्डर, स्टोरी ऐकून पोलीसही चक्रावले; तपासात उलगडलं खूनाचं सत्य
घर मालकांकडे पैसे असतील या चोरीच्या उद्देशाने या तिघांचीही या आरोपीने डोक्यात हातोडा घालून निघृण हत्या केल्याचं उघड झालं असून हत्येनंतर आरोपी उत्तर प्रदेशात पसार झाला होता .
पालघर : पालघरच्या (Palghar News) वाडा तालुक्यातील नेहरोली येथे मागील आठवड्यात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. ट्रिपल मर्डरने पालघर हादरले होते. मात्र या हत्येमागचे नेमके कारण समोर आले असून पैशासाठीच भाडेकरूनेच खून केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वाडा तालुक्यातील नेहरोली येथे मागील आठवड्यात मुकुंद राठोड, त्यांची पत्नी कांचन राठोड आणि मुलगी संगीता राठोड या तिघांचा मृतदेह बंद घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती . या प्रकरणात याच राठोड कुटुंबीयांकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या आरिफ अन्वर अली या मूळच्या उत्तर प्रदेशातील आरोपीला पालघर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे . घर मालकांकडे पैसे असतील या चोरीच्या उद्देशाने या तिघांचीही या आरोपीने डोक्यात हातोडा घालून निघृण हत्या केल्याचं उघड झालं असून हत्येनंतर आरोपी उत्तर प्रदेशात पसार झाला होता .
हत्या करुन चार चांदीच्या नाण्यांची केली चोरी
हत्या केल्यानंतर आरोपीने या घरात चार चांदीच्या कॉइनची चोरी केली.त्याने त्या चांदीच्या नाण्यांची प्रयागराज येथे विक्री केली त्याचे त्याला 2100 रुपये मिळाले. मात्र या सगळ्या तपासात पालघर पोलिसांना ठाणे येथील श्वानपथकाने विशेष मदत केली असून सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे . तसंच आरोपीसोबत आणखीन कोणी या हत्येच्या कटात सामील होतं का याचा तपास सध्या पालघर पोलिसांकडून केला जातोय .
पालघरमध्ये नेमकं काय घडले?
मूळचे गुजरात येथील असलेले मुकुंद बेचरदास राठोड त्यांच्या कुटुंबीयांसह नेहरोली या गावात वीस वर्षांपासून राहत होते. 18 ऑगस्टपासून हे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याने राजकोट येथे फॅब्रिकेशन व्यवसाय करत असलेला त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी नेहरोली येथे आला. नेहरोली येथील घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंब आजारी तर नाही ना या आशेने आजूबाजूचे सर्व दवाखाने सुहास यांनी तपासून पाहिले. आपल्या कुटुंबाचा कुठेही शोध लागला नसल्याने अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्याच्या उद्देशाने कुलूप फोडले व यावेळी घरातील दृश्य बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आई आणि मुलीचा मृतदेह एका बंद पेटीमध्ये आढळून आला तर वडिलांचा मृतदेह बाथरूम मध्ये पडलेला त्यांना दिसला. अनेक दिवसांपासून मृतदेह या ठिकाणी पडल्याने ते कुजलेल्या अवस्थेत होते. मृतदेहांचा बाहेर वास येऊ नये या उद्देशाने बहुदा मृतदेहांवर जाड गाद्या टाकण्यात आल्या होत्या.
हे ही वाचा :