Palghar : राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या नवजात बालकाचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू
गेल्या सहा दिवसांपासून हे बाळ मृत्यूशी झुंज देत होते. मात्र अखेर त्याची झुंज अपयशी ठरली आहे
पालघर : पालघरमध्ये काही दिवसांपूर्वी एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली होती. दुर्देवाने या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे बाळ मृत्यूशी झुंज देत होते. मात्र अखेर त्याची झुंज अपयशी ठरली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे. कोरोनाग्रस्त मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. पालघरमधील सफाळे येथील टेकरीचा पाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका नवजात बालकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. हे बाळ जन्माला आल्यानंतर 12 तासातच त्याची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
यानंतर त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र तिथे लहान बालकांसाठी कोणतीही आरोग्य सुविधा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना लागण झालेल्या या बाळाला उपचारासाठी तब्बल तीन तास वणवण करावी लागली. उपचारासाठी अनेक तासाची फरफट झाल्यानंतर त्या बालकाला जव्हार येथील पतंग शहा कुटिर रुग्णालयात एनआयसीयू मध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दिवसेंदिवस बाळाची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्याला जव्हार रुग्णालयातून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेले सहा दिवस हे बाळ मृत्यूशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पहाटे पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा अखेर मृत्यू झाला. हे नवजात बाळ गेल्या सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. मात्र तरीही उपचाराअभावी त्याला हार पत्करावी लागल्याची खंत व्यक्त केली जात आहे
दरम्यान पहिल्यांदा अशाप्रकारे एका नवजात बाळाला कोरोना झाल्याची घटना समोर आली होती. त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच या घटनेमुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात; संभाजीराजेंचा इशारा
- दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये मल्याळम भाषेच्या वापरावर बंदीचा निर्णय मागे, दिल्ली सरकारची हॉस्पिटल प्रशासनाला नोटीस
- Coronavirus : तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा विश्वास