सरकारी काम अन् तीन पिढ्या थांब! उस्मानाबादमधील प्रकल्पग्रस्त परिवाराचा तीन पिढ्यांचा संघर्ष, झालेल्या खर्चापेक्षा मोबदला कमीच
आपल्याकडं एक म्हण आहे सरकारी काम आणि दीर्घकाळ थांब. सरकारी कार्यालयांचे खेटे घालणाऱ्या नागरिकांना याचा चांगलाच अनुभव येत असतो. अशीच एक घटना उस्मानाबाद तालुक्यातील केशेगावची...
उस्मानाबाद : आपल्याकडं एक म्हण आहे सरकारी काम आणि दीर्घकाळ थांब. सरकारी कार्यालयांचे खेटे घालणाऱ्या नागरिकांना याचा चांगलाच अनुभव येत असतो. गावखेड्यातल्या तर अनेक पिढ्या काही प्रकरणांमुळं ठरलेल्या तारखांना 'वारी' करताना दिसून येतात. वरुन एका पिढीतल्या प्रकरणाचा न्याय त्या पिढीला मिळेल असंही नाही. अशीच एक घटना उस्मानाबाद तालुक्यातील केशेगावची समोर आली आहे. इथे राहणाऱ्या नवले कुटुंबाची जमीन जलसंधारणाच्या एका प्रकल्पासाठी संपादित झाली होती. हे प्रकरण आज हयात असलेल्या गंगाबाईच्या सासर्यांनी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आज गंगाबाईच्या नातवाला मावेजा मिळाला. सहा हजाराचा मावेजा मिळवण्यासाठी नवले कुटुंबाला 25 हजार रूपये खर्च आला आहे तर मोबदला मिळालाय 6375 रुपये.
माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील केशेगावच्या गंगाबाई रघुनाथ नवले यांचे वय 64 वर्षे आहे. गंगाबाईच्या सासऱ्याची म्हणजे प्रभू बाजी नवले यांची 2001 साली वीस गुंठे जमीन लघुपाटबंधारे विभागाने कॅनॅालसाठी अधिग्रहित केली. जमिनीचा मोबदला म्हणून 6375 मंजूर झाले. जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून प्रभू बाजी नवले यांनी लघुपाटबंधारे कार्यालयाचे उंबरे झिजवले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जलसिंचन विभागाने काही पैसे दिले नाहीत. नवले कुटुंबाने उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात दाद मागितली. त्यासाठी वकील नेमला. त्यानंतर न्यायालयात दीर्घकाळ निकाल लागला नाही.
न्यायालयात काय घडले
त्यांनी उस्मानाबादच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. 2004 मध्ये त्यांनी अॅड.व्यंकट गुंड यांच्या माध्यमातून दिवाणी दावा दाखल केला होता. यामध्ये अनेकवेळा सुनावणी झाली मात्र, यामध्ये निर्णय होऊ शकला नाही. हे प्रकरण 2010 मध्ये लोक अदालतमध्ये दाखल केले होते. आज या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी त्यांना जमिनीचा मोबदला म्हणून अठरा हजार पाचशे रुपये मावेजा द्यावा असा कोर्टाने निकाल दिला. प्रचंड संघर्षानंतर आजोबांनी दाखल केलेल्या प्रकरणाचा आपल्या वडिलांना मिळणारा मावेजा आज दाजी रघुनाथ तवले या नातवाला मिळतोय. आज व्याजासह 18 हजार 503 रुपये लघु पाटबंधारे विभागाला नवले यांच्या वारसांना द्यावे लागले असल्याचे अॅड. व्यंकट गुंड यांनी सांगितले.
नवले हयात असतानाच त्यांना मावेजा मिळाला असता तर कदाचित जमीन तलावाचे दुखः हलके झाले असते. यामुळे लोकअदालतीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीही न्यायालयाने तरतुद करण्याची गरज आहे. आपली परिस्थिती हालाखीची असताना ही या प्रकरणात नवले कुटूंबाने 25 हजार पेक्षा जास्त खर्च केला आहे. अजून वकिलाची फी देणे बाकी आहे.उस्मानाबाद लघु पाटबंधारे विभागाच्या अशा बेबंदशाहीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
लोकअदालतीत काय झाले..
हे प्रकरण लोक अदालतीमध्ये तडजोडसाठी ठेवण्यात आले. तिथे तडजोड करण्यात आली. तडजोडीनंतर अवघे सव्वा सहा हजार रुपये मोबदला मंजूर झाला. नियमाप्रमाणे लोकअदालतीत मावेजा तत्काळ खातेदाराला मिळायला हवा. पण असं असूनही गंगाबाईचे सासरे त्यानंतर गंगाबाईचाचा नवरा या दोघांचंही न्यायालयीन प्रकरणात खेटे मारून मारून निधन झालं, परंतु मावेजा मिळाला आला नाही. आता गंगाबाईच्या नाताला या मावेजाचा लाभ झाला आहे.
निकाल काय आला…
तब्बल वीस वर्षांनी नवले कुटुंबाला जमिनीचा मोबदला म्हणून अठरा हजार पाचशे रुपये मावेजा द्यावा असा कोर्टाने निकाल दिला. प्रचंड संघर्षानंतर आजोबांनी दाखल केलेलं प्रकरण आणि मावेजा नातवाला मिळतोय तोही तुटपुंजा. परिस्थिती हालाकीची असताना ही या प्रकरणात नवले कुटूंबाने 25 हजार पेक्षा जास्त खर्च केला आहे. अजून वकिलाची फी देणे बाकी आहे.