एक्स्प्लोर
महाराष्ट्रात 35 नव्हे तर केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी: राहुल गांधी
महाराष्ट्रात 35 हजार कोटी कर्ज माफ केल्याचं सांगितलं जातंय, पण प्रत्यक्षात 5 हजार कोटींची कर्जमाफी होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
नांदेड: "या देशाला जशी उद्योगपतींची गरज आहे, तशीच शेतकऱ्यांचीही आहे. पण मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत", असा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते नांदेडमध्ये बोलत होते.
“गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात 9 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागच्या तीन वर्षात भारतातील शेतकऱ्यांवर आक्रमण झालं आहे. गुजरातमध्ये मोदींनी नॅनो फॅक्ट्रीसाठी एका व्यक्तीला 65 हजार करोड रुपये दिले. पण शेतकऱ्यांना एकही पैसा दिला नाही”, असा घणाघात राहुल गांधींनी केला.
काँग्रेसच्या दबावामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात कर्जमाफी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला.
महाराष्ट्रात 35 हजार कोटी कर्ज माफ केल्याचं सांगितलं जातंय, पण प्रत्यक्षात 5 हजार कोटींची कर्जमाफी होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
कर्जमाफीत शेतकऱ्याची जात का विचारली जाते? असा सवाल त्यांनी केला.
नोटाबंदीच्या अपयशाला मोदी जबाबदार
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी करुन सर्वसामान्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली. नोटबंदीच्या अपयशाला मोदीच जबाबदार आहेत. नोटाबंदीमुळे दहशवाद कमी होईल असा दावा करण्यात आला. पण काश्मीरमध्ये तो वाढल्याचंच चित्र आहे. याशिवाय काळ्या पैशाचंही कारण दिलं, पण कुठे आहे काळा पैसा? असा सवाल राहुल गांधींनी केला.
मेक इन इंडियाचा उपयोग काय?
शेतकरी रक्षण आणि बेरोजगारांना रोजगार या देशातील 2 मुख्य समस्या आहेत. सर्वत्र ‘मेड इन चायना’चे सामान दिसते, आपली स्पर्धा चीन सोबत आहे. मोदी म्हणाले होते 2 कोटी तरुणांना रोजगार देईन, पण प्रत्यक्षात शून्य तरुणांना रोजगार मिळाला. मग ‘मेक इन इंडिया’चा उपयोग काय, अशी विचारणा राहुल गांधींनी केली.
मोदी खोटी स्वप्नं दाखवतात
मोदी बुलेट ट्रेनबद्दल बोलतात पण शिक्षण, आरोग्य, रोजगार यासाठी सरकार काहीच करत नाही. केवळ स्वप्न दाखवले जातात. काँग्रेसमध्ये कमतरता आहे, पण ती कमतरता म्हणजे आम्ही खोटे स्वप्न दाखवू शकत नाही. देशातील सर्व राज्यात जातीय द्वेष पसरवला जातोय. गोवा, मणिपूर गुजरात मध्ये भाजप मतदारांना खरेदी करते, असा आरोप राहुल गांधींनी केला.
जीएसटी
मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहीत करुन मारलं, मग नोटबंदीकरून त्यांना नागवलं. त्यानंतर जीएसटी लागू केली. GST हे काँग्रेसचं धोरण होतं, पण आपल्या गरीब देशात 18 टक्के पेक्षा जास्त कर नको अशी आमची इच्छा होती, शिवाय त्यात वेगवेगळे स्लॅब नकोत असा आमचा GST होता, पण आज 28 टक्के कर आहे आणि 5 स्लॅब आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
या देशाला काँग्रेसने उभं केलंय, पण याच देशात भाजप दंगल घडवून आणत असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement