Pandharpur Temple Visit : नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा मोठा निर्णय!
Pandharpur Temple Visit : पंढरपूर देवस्थान समितीने मोठा निर्णय घेतला आहे. आता नवदाम्पत्यांना रांगेत उभे न राहता थेट दर्शन मिळणार आहे.
![Pandharpur Temple Visit : नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा मोठा निर्णय! newly married couple will get entry in Pandharpur vitthal rukmini Temple without standing in row Pandharpur Temple Visit : नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा मोठा निर्णय!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/801375aa105d73513238a5fffb2bfbf41738064129998988_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pandharpur Temple Visit : आषाढी-एकादशीसह इतरही दिवशी पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. आता मात्र मंदिर समितीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. याच निर्णयांनुसार नव्याने लग्न केलेल्या जोडप्यांना विठ्ठलाचे थेट दर्शन घेता येणार आहे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही.
नव्या जोडप्यांना थेट दर्शन
राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते. मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवदांपत्याला तासंतास तिष्ठत उभे राहावे लागते. आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून या नवदांपत्याला त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. आज मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात
आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघ यात्रेसाठी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्राप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असून भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी सहा पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिकांच्या दर्शन वेळेत वाढ
पंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा या वेळात आता थेट दर्शन दिले जाणार आहे . यापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी सकाळी सहा ते साडेसहा एवढाच वेळ दर्शनासाठी असायचा. आज झालेल्या बठकीत ही वेळ वाढविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनाही विठुरायाचे दर्शन सुलभ रीतीने होणार आहे.
दर्शनरांगेत मृत्यू झाल्यास एक लाख रुपयांची मदत
विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे अंध अपंग दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे. अंध , अपंगांसोबत आता नवविवाहितांनाही झटपट दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)