NCP News : निवडणुकांसाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली, जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना 'हे' आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्रक जारी केलं आहे.
NCP News : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाध्यक्षांनी बैठक बोलावून चर्चा करावी असे आदेश दिले आहेत. तसेच उमेदवारांची चाचपणी करण्यास देखील सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला लागली असल्याचे दिसत आहे. लवकरच राज्यात 25 जिल्हा परिषद, 284 पंचायत समित्या, 23 महानगरपालिका, 211 नगरपालिका, 10 नगरपंचायत आणि सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक बोलवावी. या बैठकीस जिल्ह्यातील आमदार, खासदार, आजी-माजी आमदार ,खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्ह्यातील प्रमुख नेते, जिल्ह्याचे फ्रन्टल व सेलचे राज्यप्रमुख यांनाही निमंत्रित करावे, असे निर्देश जयंत पाटील यांनी दिले आहेत.
ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या सर्व ठिकाणी पालकमंत्री, संपर्कमंत्री, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार यांनी दौरे करुन बैठका घेऊन आपल्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करावा, तसेच उमेदवारांची चाचपणी करुन पूर्वतयारी करावी. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेऊन मार्ग काढण्याच्या दृष्टीनेही पाऊले उचलावीत,. बैठकीमध्ये केंद्र सरकारचे चुकीचे धोरण, महागाई, आरक्षण यासंदर्भात केंद्र सरकारने केलेली दिशाभूल व दिरंगाई, घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल वाढ अशासारख्या इतर विषयांवरही चर्चा करावी. तसेच याबाबत आपण वारंवार प्रसिध्दी व प्रसार माध्यमांशी व्यक्त होणे अपेक्षित असल्याचे जयंत पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण आहे. तसेच ज्या प्रवर्गात राखीव जागा आहेत, तेथील संभाव्य उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र पडताळणी अगोदर करण्याबाबतही तेथील पदाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. आपण पक्षस्थितीचा वस्तुनिष्ठ गोपनीय अहवाल माझ्या नावे पाठवावा, ही विनंती, असे जयंत पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- राज्यात मिनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार? 'या' 14 महापालिका, ZP निवडणुका होण्याची शक्यता
- State Election Commission : पावसाळ्यात निवडणुका घेणं अवघड, राज्य निवडणूक आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र