(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhima Koregaon: शरद पवारांची चौकशी आयोगापुढील हजेरी पुन्हा एकदा लांबली; मुदतवाढीचा अर्ज आयोगाने स्वीकारला
शरद पवारांच्या वतीनं न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आयोगापुढे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. त्याला आयोगाने परवानगी दिली आहे.
मुंबई: भीमा कोरेगाव इथं घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या न्या. जे. एन. आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी हजेरी लावणार नाहीत. याप्रकरणी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज त्यांच्यावतीने आयोगाकडे मंगळवारी दाखल करण्यात आला असून आयोगानेही त्यांचा अर्ज स्वीकारला आहे. आयोगाकडून जारी केलेल्या वेळापत्रकानुसार 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते.
पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिल्ह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरूच आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं, तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे, असं पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.
या घटनेनंतर पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे यासंदर्भातील काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं सागर शिंदे यांनी आपल्या अर्जात नमूद केलं होतं. त्याची दखल घेत आयोगानं शरद पवार यांना 23 आणि 24 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स पाठवलं होतं. यापूर्वी मुंबईत होणाऱ्या सुनावणी सत्रादरम्यान 4 एप्रिल 2021 ला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचं समन्स जारी करण्यात आलं होतं. मात्र काही कारणास्तव तेव्हाही पवार या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha