Supriya Sule : 'त्या' गटाचे वकील शरद पवारांना भेटले की सॉरी म्हणतात, सुप्रिया सुळेंची बारामतीत टोलेबाजी
Supriya Sule : दोन्ही गटाचे वकील माझे चांगले मित्र आहेत, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय.
बारामती : त्या गटाचे वकिल शरद पवारांना (Sharad Pawar) भेटले की त्यांना सॉरी म्हणतात. दोन्ही बाजूचे वकिल माझे दोस्त आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चिन्ह आणि पक्षाची लढाई सुरु झाली. अद्यापही निवडणूक आयोगात ही सुनावणी सुरु आहे. दरम्यानच्या काळात दोन्ही गटातील नेत्यांकडून दावे प्रतिदावे करण्यात येतात.
'हम जितेंगे ये बाद मे देखेंने मगर लढेंगे जरुर', असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वी प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं. त्याचप्रमाणे आता दोन्ही गटातील वकिल हे माझे मित्र आहेत, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलंय.
'वकिलांबरोबर राहायची आता सवय झाली'
'कोर्टाची पायरी आता चढलोच आहोत तर उतरायची नाही. जेव्हा आपण खरे असतो तेव्हा लढायची आणि निकालाची भीती वाटत नाही कारण आपण खरे असतो. निवडणूक आयोग कधी निकाल देईल माहिती नाही. पण वकिलांबरोबर आता राहायची सवय झालीय. बरेच दिवस वकील नाही भेटले तर कसं तरी वाटतं. दोन्ही बाजूचे वकील माझे दोस्त आहेत. त्यामुळे मी चहा एका बरोबर घेते आणि जेवण एका बरोबर करते. त्यामुळे लोक म्हणतात की हे काय चाललंय, पण मी त्यांना प्रेमाने म्हणते आपली दोस्ती एका बाजूला आणि लढाई एका बाजूला. वकील देखील शरद पवारांना भेटल्यानंतर सॉरी म्हणतात', असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
आता मला फक्त टीव्हीवरच बघा - सुप्रिया सुळे
मतदार संघातील कामाचा अर्धा वेळ हा केस लढवण्यात जातो. त्यामुळे आता नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की, आता 11 महिने बाय म्हटलं. त्यांना मी आता म्हटलंय की मला फक्त टिव्हीवरच बघा. मतदार संघातील कामे बघायची की कोर्टाच्या केसेस बघायच्या असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मी कोर्टात 80 वर्षाच्या वडिलांना एकटं जाऊन देईल का? पण आता न्यायालयीन लढा लढायला आता मज्जा यायला लागलीये. तिथले एक वकिल हे सदानंदचे मित्र आहेत ते देखील मला येऊन भेटतात. माझा बराचसा वेळ हा या कामात जातो. त्यामुळे मतदारांनी मला समजून घ्या. तुमच्या मतदार संघातून मी गायब झालेले नाही, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केलीये.
सध्या राष्ट्रवादीची लढाई निवडणूक आयोगात सुरु आहे. याबाबत निकाल अद्याप लागायचा आहे. निवडणूक आयोगातील पहिल्या सुनावणीसाठी स्वत: शरद पवार हे देखील उपस्थित राहिले होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचा आणि चिन्हाचा निकाल नेमका काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.