जळगाव शहरात रस्त्यांची दुरावस्था, सत्ताधारी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
जळगावात रस्त्यासह विविध विकासकामे ज्या पद्धतीत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीत होत नसल्याने शिवसेनेची सत्ता असली तरी आघाडीतील इतर पक्षाच्या विरोधातही नागरिकांचा रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.
जळगाव : जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेविरोधात आंदोलन केलं. जळगाव शहरात सध्या असलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थे संदर्भात शिवसेनेची सत्ता असलेल्या जळगाव मनपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कामे करता येत नसतील तर महापौरांनी आपला राजीनामा द्यावा, अशा प्रकारची मागणी देखील यावेळी करण्यात आल्याने याची राजकीय क्षेत्रात सर्वत्र चर्चा सुरु आहे.
राज्यात शिवेसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे एकत्रित महाविकास आघाडी सरकार आहे. या तिन्ही पक्षांच्या वतीने जळगाव मनपामधील भाजपचा मोठा गट शिवसेनेकडे वळवण्यात यश मिळाल्याने जळगाव मनपाची भाजपची सत्ता उलथून टाकण्यास यश मिळाले होते. भाजपची सत्ता गेल्यान शिवसेनेचा महापौर बनल्यानंतर तरी शहरातील विविध समस्या सोडवल्या जातील, अशी सर्वसामान्य जनतेच्या मनात अपेक्षा होती.
मात्र पावसळा सुरू झाल्यापासून शहरातील रस्त्यांची अवस्था कधी नव्हे एवढी बिकट झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मोठी नाराजी बघायला मिळत आहे. असे असले तरी रस्त्यासह विविध विकासकामे ज्या पद्धतीत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीत होत नसल्याने शिवसेनेची सत्ता असली तरी आघाडीतील इतर पक्षाच्या विरोधातही नागरिकांचा रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.
यामुळेच राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आज जळगाव मनपा परिसरातच जोरदार निदर्शने करत महापौर आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. लवकरच रस्ते दुरुस्ती काम पूर्ण केले नाही तर सरकार आघाडीचं असलं तरी जनतेच्या प्रश्नावर आम्हाला आवाज उठविण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.