‘त्या’ फाईलसाठी BHR घोटाळ्याच्या नावाने धाडी टाकल्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे खडसे, महाजनांवर गंभीर आरोप
‘त्या’ फाईलसाठी BHR घोटाळ्याच्या नावाने धाडी टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्यासह गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि पारस ललवाणी या चौघांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे.
जळगाव : पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते, गिरीश महाजन यांचे समर्थक आणि आताचे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असलेले जामनेरमधील प्रफुल्ल लोढा यांनी एकनाथ खडसे यांच्यासह गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि पारस ललवाणी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या चौघांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्या गैरकृत्याची फाईल माझ्याकडे पत्रकार परिषदेत प्रफुल्ल लोढा यांनी आरोप करताना म्हटलं आहे की, गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्या गैरकृत्याची फाईल माझ्याकडे असल्याचं मी एकनाथ खडसे यांना सांगितलं होतं. यानंतर ही फाईल आपल्याला मिळावी, यासाठी खडसे यांनी आपल्याकडे मागणी केली होती. मात्र त्या फाईलमध्ये काही निरपराध लोकांचं सार्वजनिक आयुष्य खराब होणार असल्याने आपण ती त्यांना दिली नाही. मात्र खडसे यांना ही फाईल महत्वाची असल्याने त्यांनी गृहमंत्र्यांची दिशाभूल करत पुणे पोलिसांच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने बीएचआर घोटाळ्याशी आपला संबंध असल्याचं भासवून ती फाईल मिळविण्यासाठी आपल्या घराची तसेच आपल्या जवळच्या मित्रांच्या घराची आणि नातेवाईकांची तपासणी केली, असं लोढा यांनी म्हटलं आहे.
खडसे हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत
राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेल्या खडसे यांच्या या कृत्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याने आपण ही पत्रकार परिषद घेतली असल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे. खडसे हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण करीत असून त्यांनी आपल्या विश्वासाला त्यांनी धोका दिला आहे, असा आरोपही लोढा यांनी केला आहे. खडसे यांच्या सोबतच गिरीश महाजन, पारस ललवाणी आणि रामेश्वर नाईक यांच्यासारख्या राजकारणातील खालच्या पातळीचं राजकारण करणाऱ्या लोकांना आपण उघडं पाडणार असून त्यासाठी वाट्टेल ती किंमत आपण मोजण्यास तयार असल्याचं प्रफुल्ल लोढा यांनी म्हटलं आहे.
बीएचआर घोटाळ्याशी आपला काडीचाही संबंध नाही. मात्र आपला संबंध दाखवण्यासाठी हे राजकारणी पोलिसांची मदत घेऊन खोट्या गुन्ह्यात आपल्याला अडकवू शकतात असंही लोढा यांनी म्हटलं आहे.