Ajit Pawar: मुख्यमंत्री होण्यासाठी बावनकुळेंकडून खास टीप्स घेईल; अजित पवारांचा टोला
Ajit Pawar: मुख्यमंत्री कसे बनावे, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून टीप्स घेणार असल्याचा टोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे.
Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule: विरोधी पक्षेतेने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा राज्यभर रंगत आहे. तसे बॅनर्स देखील लागत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असं वक्तव्य करुन चर्चांना उधाण आणलं होतं. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्या तोंडी साखर पडो म्हणत अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. त्यासोबत मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंकडून टीप्स घेईल, असंही ते म्हणाले.
मागील काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यापूर्वी एका मुलाखतीत अजित पवार यांनीदेखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मग, आता बावनकुळे यांच्याकडून टीप्स घेतो...
सगळीकडे बॅनरबाजी सुरु असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री होण्यासाठी काम करावं लागतं बॅनरबाजी करुन मुख्यमंत्री होता येत नाही यावर अजित पवार यांनी बावनकुळेंचा सल्ला घेणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, काही कामानिमित्त मी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर वेळ मिळाला की मी लगेच नागपूरला जाऊन बावनकुळेंची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी काय काम करावं लागतं आणि कसं काम केल्यावर आपल्या पक्ष आपल्याला तिकीट देतो कसं काम केलं नाही तर तिकीट नाकारतो आपल्यालाही नाकारतो बायकोला देखील नाकारतो. या सगळ्यांची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे बावनकुळेंकडून घेतो आणि त्यांचा मोलाचा सल्लादेखील घेतो, असं ते म्हणाले.
बारसूला मी स्वत: जाणार
बारसू रिफायनरी प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर अजित पवार म्हणाले की बारसूमध्ये मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सत्ता कोणाची ही असो आपण त्यात सकारात्मक गोष्टीने बघायला हवं. या प्रकरणात शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. स्थानिकांचं मत जाणून घेणार आहे. राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी राज्यात मोठे प्रकल्प आणले पाहिजे. मात्र हे सगळं करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली पाहिजे. कोकणात लोक फिरायला जातात. राहायला जातात त्यांना त्रास होणार नाही हे बघायला हवं, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले.