Nawab Malik vs Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या बदली प्रकरणात अमित शाह कनेक्शन? नवाब मलिकांना मिळालेल्या पत्रात खुलासा
Nawab Malik vs Sameer Wankhede : NCBमध्ये चुकीच्या पद्धतीनं काम सुरु असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. तसेच, एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळाल्याचंही सांगितलं आहे.
Nawab Malik vs Sameer Wankhede : क्रूझ ड्रग्स प्रकरणाला सध्या वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. सध्या या प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आरोपांच्या कचाट्यात सापडले आहेत. अशातच या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक या प्रकरणी दररोज नवनवे दावे करत आहेत. अशातच आज पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांनी एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळाल्याचं सांगितलं आहे. हे पत्र नवाब मलिकांनी ट्वीटही केलं आहे. या पत्रात फसवूणक झालेल्या 26 प्रकरणांची माहिती असल्याचं मलिक यांनी सांगितलं आहे. तसेच हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही मलिकांनी सांगितलं आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीनं काम सुरु असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. दरम्यान, या पत्रात गृहमंत्री अमित शाह आणि एनसीबीचे माजी डायरेक्टर जनरल राकेश अस्थाना यांच्यासह अनेक बॉलिवूडकरांची नावं आहेत.
नवाब मलिकांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "समीर वानखेडे जेडीआरआय मुंबईचे प्रभारी होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विचारून डीआरआयकडून लोन बेसिसवर एनसीबी मुंबईमध्ये झोनल डायरेक्टर पदी बदली करुन घेतली. राकेश अस्थाना हे किती प्रामाणिक अधिकारी आहेत, हे सर्वांना माहीत असून त्यांनी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना बॉलीवूड अभिनेत्यांच्या खोट्या ड्रग्ज प्रकरणात गोवलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांनी या कलाकारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. राकेश अस्थाना यांनाही त्यातील काही रक्कम देण्यात आली होती. बॉलिवूडच्या या कलाकारांमध्ये दीपिका पादुकोण, करिश्मा प्रकाश, श्रृद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती आणि अर्जुन रामपाल यांच्याकडून त्यांचे वकील अयाज खान यांनी एकत्र करुन दिले होते. अयाज खानची समीर वानखेडेशी मैत्री असून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय एनसीबी कार्यालयात ये-जा करु शकतात. अयाज खान दर महिन्याला बॉलीवूड कलाकारांकडून पैसे गोळा करून समीर वानखेडे यांना आणून देतात."
या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती : नवाब मलिक
नवाब मलिकांनी बोलताना सांगितलं की, "दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र मिळालं आहे. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहे. या केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलं आहे, अथवा फसवण्यात आलंय याबाबतची माहिती त्या आधिकाऱ्यांनी दिली आहे." राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना हे पत्र पाठवलं आहे. यामध्ये 26 केसेसचा उल्लेख केला गेलाय. कशाप्रकारे पैसे वसूल केली जाते, कशाप्रकारे चुकीची कामे केली जाते, याचा उल्लेख त्या पत्रात आहे, असे मलिक म्हणाले. दोन दिवसांपूर्वी परभणी दौऱ्यावर जात असताना पत्र मिळालं. हे पत्र मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवलं आहे. तसेच समीर वानखेडे यांची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या कमिटालाही हे पत्र पाठवलं जाणार आहे. तपासांमध्ये या पत्रातील 26 केसेसचा समावेश करावा, ही विंनती करणार आहे. समीर वानखेडे यांच्याकडून वसूली झाली आहे. मालदीव आणि मुंबईमध्ये वसूली झाली आहे. माझ्या अंदाजानुसार एक हजार कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे. एनसीबीच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असेही मलिक यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :