Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Delhi Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे.

Delhi Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 30 जण जखमी आहेत. या स्फोटानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. दिल्लीत 14 वर्षानंतर अशाप्रकारचा स्फोट (Delhi Blast) झाल्याने राजधानीसह संपूर्ण देश हादरला. हा स्फोट दहशतवादी हल्ल्याचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. मोहम्मद उमर (Mohammad Umar) या व्यक्तीने फिदाईन हल्ला करत कारमधील स्फोटकांचा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व सुरक्षायंत्रणा सध्या युद्धपातळीवर कामाला लागल्या असून या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे धुंडाळण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Delhi News)
'एबीपी न्यूज'ला मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ जिथे स्फोट झाला त्याठिकाणी कोणतेही शार्पनेल ऑब्जेक्ट म्हणजे खिळ्यासारख्या टोकदार किंवा अणकुचीदार वस्तू सापडलेल्या नाहीत. फॉरेन्सिक टीमकडून सातत्याने स्फोट झालेल्या ठिकाणावरुन पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यांनी घटनास्थळाची तपासणी केली असताना त्यांना याठिकाणी कोणत्याही अणकुचीदार वस्तू सापडलेल्या नाहीत. यावरुन या स्फोटासाठी कोणती स्फोटके वापरण्यात आली होती, याचा शोध लावला जाऊ शकतो. सध्या सुरक्षा यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीमकडून यासंदर्भात तपास सुरु आहे.
याशिवाय, कालच्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नऊ जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, काहीजणांच्या शरीराचे तुकडे झाले होते. या छिन्नविछिन्न मृतदेहांचे शवविच्छेदनही पूर्ण झाले आहे. यामधून काही नवीन माहिती समोर येणार का, हे पाहावे लागेल. दरम्यान, काल स्फोट झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काल रात्रभर दर्यागंज आणि पहाडगंज भागातील हॉटेल्समध्ये शोध मोहीम राबवली. या सर्व हॉटेल्सचे रजिस्ट्रर चेक करुन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. तसेच चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
ज्या आय 20 कारमध्ये हा स्फोट झाला ती दिल्लीत कशी आणि कधी आली, याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी पोलिसांनी दिल्लीतील 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. यापैकी काही सीसीटीव्ही फुटेजमधून ही कार दिल्लीत कोणत्या मार्गाने आली आहे, याची काही माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही आय 20 कार 3 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली. त्यानंतर 6 वाजून 23 मिनिटांनी ही कार पार्किंगमधून निघाली आणि 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट झाला होता.
आणखी वाचा
मोहम्मद उमरने स्वत: कार चालवत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय; नेमकं काय घडलं?, खळबळजनक माहिती समोर
























